मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावांत भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळला. कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात अजिंक्यने ११२ तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – कर्णधार अजिंक्यचा मेलबर्नमध्ये डंका, धोनीसोबत मानाच्या पंगतीत स्थान

दुसऱ्या डावात ७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रहाणेने विजयी फटका खेळत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या निमीत्ताने तब्बल ७ वर्षांनी भारतीय कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये विजयी फटका खेळण्याचा योगायोग जुळून आला आहे. २०१३ साली कर्णधार धोनीने दिल्ली कसोटीत विजयी फटका खेळला होता.

भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – आभाळाएवढं दुःख विसरुन तो लढला आणि यशस्वीही झाला, बॉक्सिंग डे कसोटीवर सिराजची छाप