Shreyas Iyer available for Ranji Trophy : टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरने आणखी एक यू-टर्न घेतला आहे. श्रेयस अय्यर आता रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यरने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध घोषित केल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. मात्र, याआधी श्रेयस अय्यरने उपांत्यपूर्व फेरीसाठी स्वत:ला फिट नसल्याचे घोषित केले होते. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अय्यर खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले होते.

२ मार्चपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीत मुंबईचा सामना तामिळनाडूशी होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने एमसीएच्या हवाल्याने म्हटले आहे की, “श्रेयस अय्यरने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे की, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तसेच तो उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.”

अय्यरच्या बाबतीत निर्माण झाला होता वाद –

यापूर्वी श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळाले होते. पण अय्यरला दोन कसोटीत एकही अर्धशतक करता आले नाही. अय्यरने पहिल्या दोन कसोटीत ३५, १३, २७ आणि २९ धावा केल्या. यानंतर अय्यरला संघातून वगळण्यात आले. मात्र, दुखापतीमुळे अय्यर बाहेर असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण नंतर अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला संघातून वगळण्यात आले. यानंतर बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, जे खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाहीत, त्या सर्व खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळावी.

हेही वाचा – VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

मुंबई आणि बडोदाचा सामना अनिर्णीत –

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई आणि बडोदा आमनेसामने आले होते. मंगळवारी हा सामना अनिर्णात राहिल्याने मुंबई संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात मुंबई संघाने पहिल्या डावात ३८४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मुशीर खानने २०३ धावांची खेळी साकारली होती. प्रत्युत्तरात बडोदा संघाने ३४८ धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात हार्दिक तामोरे, तुषार देशपांडे आणि तनुष कोटियनच्या शतकाच्या जोरावर ५६९ धावा केल्या. यानंतर पहिल्या डावातील आघाडी मिळवून बडोद्यासमोर ६०६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पंरतु प्रत्युत्तरात बडोद्याने ३ बाद १२१ धावा केल्या आणि सामना अनिर्णीत राहिला आणि मुंबई संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.

हेही वाचा – Mohammed Shami : ”तुम्ही या दुखापतीवर धैर्याने…”, शमीच्या शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दिला धीर

विदर्भाचा कर्नाटकवर १२७ धावांनी विजय –

पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने कर्नाटकवर १२७ धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात विदर्भाने कर्नाटकसमोरविजयासाठी ३७१ धावांच्या विशाल लक्ष्य ठेवले होते. मात्र, कर्नाटकचा संघ ६२.४ षटकांत २४२ धावांवर गारद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना. मयंक अग्रवालने ७० आणि अनीस केव्हीने ४० धावांचे योगदान दिले. विदर्भाकडून गोलंदाजी करताना आदित्य सरवटे आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. आता उपांत्य फेरीत विदर्भासमोर मध्य प्रदेशचे आव्हान असणार आहे.