रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून सुरुवात
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रणजी स्पर्धेला सुरुवात होणार असून बुधवारपासून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होणार आहे. या आठ संघांमध्ये विदर्भ, मुंबई, सौराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम, पंजाब आणि बंगाल यांचा समावेश आहे.
साखळी फेरीत दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत झारखंडचा सामना करावा लागणार आहे. हा सामना म्हैसूरला खेळवण्यात येणार आहे. श्रेयस अय्यर या मुंबईच्या धडाकेबाज फलंदाजाने यंदाचा मोसम चांगलाच गाजवला आहे. त्याचबरोबर कर्णधार आदित्य तरे, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड यांनीही दमदार फलंदाजी केली आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने आतापर्यंत सातत्याने भेदक मारा केला आहे. शाहबाज नदीमच्या नेतृत्वाखाली झारखंडने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. हंगामाच्या सुरुवातीला त्यांना चांगला खेळ करता आला नसला तरी त्यांनी हैदराबाद आणि हिमाचल प्रदेशला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले आहे.
विदर्भाचा सामना सौराष्ट्रशी
‘अ’ गटात २९ गुणांनिशी विदर्भाने अव्वल स्थान पटकावले होते. साखळी फेरीत त्यांनी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, तर दोन सामने अनिर्णित राखण्यात त्यांना यश आले होते. दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवही स्वीकारावा लागला होता. फिरकीपटू अक्षय वाखरेने साखळी फेरीत सर्वाधिक ४९ बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर फैज फझल (५१४ धावा) आणि गणेश सतीश (४६६ धावा) यांनी सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. कर्णधार एस. बद्रीनाथला मात्र अजूनही छाप पाडता आलेली नाही. सौराष्ट्रच्या संघाने साखळी फेरीत पाच विजयांसह सर्वात पहिल्यांदा बाद फेरीत स्थान मिळवले होते. सौराष्ट्रच्या विजयाचा रवींद्र जडेजा शिल्पकार ठरला होता, पण या सामन्यात त्याच्या संघ समावेशाबाबत साशंकता आहे.
बंगाल-मध्य प्रदेश समोरासमोर
ब्रेबॉनच्या खेळपट्टीवर बंगाल आणि मध्य प्रदेश हे दोन्ही संघ उपांत्यपूर्व लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. बंगालकडून सुदीप चॅटर्जी आणि मनोज तिवारी यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. पण बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाला अजूनही सूर गवसलेला नाही. मध्य प्रदेशचा जलाज सक्सेना हा भन्नाट फॉर्मात आहे, पण नमन ओझाला अजूनही छाप पाडता आलेली नाही.
आसाम पंजाबशी
दोन हात करणार
पंजाबला कामगिरीत सातत्य राखता आलेले नसले तरी त्यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. उदय कौल, मनदीप सिंग, जीवनज्योत सिंग यांच्याकडून उपयुक्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आसामपुढे पंजाबचे पारडे नक्कीच जड आहे. आसामला साखळी फेरीत ठरावीक सामन्यांमध्येच छाप पाडता आली आहे, त्यांच्याकडून
दमदार कामगिरी पाहायला मिळालेली नाही.