वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावांचा डोंगर उभा केला. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना अजिबात साथ मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेले भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी क्युरेटर आणि माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांना शिवीगाळ केली.

दक्षिण आफ्रिकेच्या विशाल धावसंख्येबाबत नाईक यांना जबाबदार धरून शास्त्री म्हणाले, ‘‘ग्रेट विकेट! (छान खेळपट्टी)’’ त्यानंतर मात्र शास्त्री यांनी मराठीतून नाईक यांना शिवी हासडली. परंतु नाईक यांनी सावध पवित्रा घेत म्हटले, ‘‘मीसुद्धा भारताकडून खेळलो आहे. मला खेळपट्टीबाबत शिकवू नकोस!’’
नाईक यांनी हे प्रकरण नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातले. ‘‘दक्षिण आफ्रिकेचा डाव संपल्यानंतर शास्त्री यांनी शिवीगाळ केल्याचे नाईक यांनी आम्हाला सांगितले. परंतु याबाबत आम्हाला लिखित स्वरूपात कोणतीही तक्रार आलेली नाही. अशा प्रकारे तक्रार आल्यावर आम्ही त्याकडे लक्ष देऊ,’’ असे एमसीएच्या सूत्रांनी सांगितले. नाईक आणि शास्त्री यापैकी कोणीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे.
महिन्याभरापूर्वी सुधीर नाईक यांना खेळपट्टी सल्लागार म्हणून सन्मानाचे पद देण्यात आले होते. एमसीएच्या आधिपत्याखाली वानखेडे, शरद पवार अकादमी (वांद्रे-कुर्ला संकुल) आणि सचिन तेंडुलकर जिमखाना (कांदिवली) ही तीन मैदाने त्यांच्या कार्यकक्षेत होती.
चेन्नईतील चेपॉकच्या खेळपट्टीने भारतीय फिरकी गोलंदाजांना अनुकूल निकाल दिल्यानंतर वानखेडेवर तशाच प्रकारे खेळपट्टी बनवण्याची विनंती संघ व्यवस्थापनाने एमसीएला केली होती. त्यानंतर दोन दिवसांत रविवारच्या सामन्यासाठी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवण्याचे आव्हान एमसीएपुढे होते. त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले. परंतु परिणाम साधला जाईल का, याबाबत सर्वच साशंक होते.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनीनेही खेळपट्टीबाबत आपली नाराजी प्रकट करताना म्हटले की, ‘‘फलंदाजांना नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी होती. फिरकी गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नव्हती. आपले बलस्थान वेगळे आहे.’’

प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करू -ठाकूर
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी वानखेडेचे क्युरेटर सुधीर नाईक यांना शिवीगाळ केली. या
प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करू, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ‘‘शास्त्री-नाईक वादाची आम्ही संपूर्ण माहिती घेत आहोत. ऑस्ट्रेलियातील एका घटनेसंदर्भात जे धोरण वापरण्यात आले होते, तेच इथे वापरू,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.