दीपा कर्माकरने अपुऱ्या सुविधा असतानाही ‘प्रोडय़ुनोव्हा’ व्हॉल्टसारख्या प्रकाराचा हजाराहून अधिक वेळा सराव करून स्वत:चा जीव तितक्याच वेळा धोक्यात घातला. अशा कठीण परिस्थितीतही तिने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले चौथे स्थान कौतुकास्पद आहे. तिला पदक मिळवण्यात थोडक्यात अपयश आले असले तरी मने जिंकण्यात ती यशस्वी झाली. तिच्यामुळे जागतिक स्तरावर जिम्नॅस्टिक प्रकारात भारताच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे आणि हे यश मोठे आहे.

पात्रता फेरीपेक्षा अंतिम फेरीत दीपाची कामगिरी उल्लेखनीय झाली. तिने केलेल्या दोन्ही व्हॉल्टमध्ये प्रचंड सुधारणा दिसली. तिने पहिल्या व्हॉल्टमध्ये १.६ गुण, तर दुसऱ्या व्हॉल्टमध्ये २.६ गुणाने सुधारणा केली आहे. अंतिम फेरीत तिने सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळेच गुणतालिकेतील क्रमवारीत तिने आघाडी घेतली. तिसऱ्या स्थानावर आलेल्या स्वित्र्झलडच्या गुलिया स्टेइंग्रुबर आणि दीपा यांच्या गुणांमध्ये फार फरक नाही. सिमॉन बिल्स, मारिया पासेका आणि गुलिया या अव्वल तीन स्थानांमध्ये जागा मिळवणाऱ्या खेळाडूंची कामगिरी सातत्यपूर्ण झाली. त्यांच्या तुलनेत दीपाने खूप मोठी भरारी घेतली. अंतिम फेरीत चौथे येणे हे फार मोठे यश म्हणावे लागेल. याही वेळेला तिचा पाश्र्वभाग जमिनीला टेकला. त्यामुळे गुण कमी झाले. त्यात हात टेकवून जेव्हा ती वर जाते, त्याची तुलना इतर खेळाडूंशी कराल तर फरक जाणवेल. वर जाऊन दोन गिरक्या घेऊन पुन्हा जमिनीवर येताना पुरेसा वेळ तिला मिळत नाही, हे म्हणणे खूप सोपे आहे, पण हे खूप आव्हानात्मक आहे.

आपण विश्लेषण करताना त्या-त्या दिवसाचे करतो, परंतु दीपाने गेली दोन वष्रे उपलब्ध सुविधांमध्ये घेतलेल्या मेहनतीचाही विचार करायला हवा. इतर देशांशी तुलना केल्यास भारतातील सुविधा अपुऱ्या आहेत. त्यातही तिने ही झेप घेतली, याचे श्रेय तिला द्यायलाच हवे. ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा खूप कठीण आणि जीवघेणा प्रकार आहे. हजाराहून अधिक वेळा हा धोका पत्करल्यानंतर दीपाने ही भरारी घेतली आहे. प्रत्येक वेळेला ‘प्रोडय़ुनोव्हा’ करताना तितकेच लक्ष केंद्रित ठेवावे लागते, तेवढाच आत्मविश्वास बाळगावा लागतो. कारण यात कमतरता राहिली की जिवावर बेतू शकते. बाकीच्या देशांमध्ये खेळाडूंना सर्वप्रथम या सुविधा पुरवल्या जातात. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. या सुविधा आपल्याकडे नाहीत. अशा परिस्थितीतही दीपाने ‘प्रोडय़ुनोव्हा’सारखा आव्हानात्मक व्हॉल्ट निवडला आणि दररोज त्याचा सराव केला. तिच्या जिद्दीला आणि धाडसाला सलाम करावा लागेल.

तिच्या कामगिरीने जिम्नॅस्टिक हा खेळ म्हणून घराघरांत पोहोचला आहे. आतापर्यंत स्टंट किंवा नृत्यांमध्ये जिम्नॅस्टिकचा वापर होत होता. दीपामुळे भारतात जिम्नॅस्टिकवर चर्चा होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने भारताला जिम्नॅस्टिकमध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे आणि आता आपल्याला त्याची परतफेड करायची वेळ आलेली आहे.

ऑलिम्पिक झाल्यानंतर काही काळ चर्चा होते आणि वर्ष-दोन वर्षांनंतर ‘जैसे थे’, ही दुर्दैवी बाब आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवायचे असल्यास त्याचे योग्य नियोजन करायला हवे. चार वर्षांत ते शक्य नाही. आतापासून नियोजन केले, तर २०२४च्या ऑलिम्पिकचे स्वप्न पाहू शकतो. दीपाच्या या यशानंतर सरकार जिम्नॅस्टिककडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघेल. केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवणे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणणे पुरेसे नाही. तळाच्या स्तरापासून काम होण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्तरावरील अव्वल १२ खेळाडूंना निवडून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या हाताखाली द्या, त्याने फार फरक पडणार नाही. कनिष्ठ स्तरापासून योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

२०२४च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने विचार केल्यास आता १२-१३ वर्षांच्या मुलांना मार्गदर्शन केले, तर त्याचा फायदा जास्त दिसेल. फक्त खेळाडूच नव्हे, तर प्रशिक्षक घडवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या हाताखाली येणाऱ्या खेळाडूंचे वय अधिक असते. त्यांना कनिष्ठ खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सांगितले तर अधिक फायद्याचे ठरेल.