मॅरेथॉन लढतीत लिन डॅनवर मात

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईने महान खेळाडू लिन डॅनला नमवत पुरुष एकेरीत अंतिम फेरी गाठली. कारकीर्दीत नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी असलेले ली चोंग वेई आणि लिन डॅन एकमेकांचे चांगले मित्र आहेत. याआधी दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये लिन डॅनने ली चोंग वेईला हरवले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या लढतीत ली चोंग वेईने लिनवर १५-२१, २१-११, २२-२० अशी मात केली. अंतिम फेरीत ली चोंग वेई आणि चेन लाँग आमनेसामने असणार आहेत.

कलात्मक आणि मनगटी खेळावर भर देणाऱ्या लिन डॅनने पहिला गेम सहजतेने नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये ली चोंग वेईने मॅरेथॉन रॅलींवर भर देत लिन डॅनला दमवले. नेटजवळ रंगलेल्या अफलातून रॅलींमध्ये चोंग वेईने सरशी साधली. क्रॉसकोर्ट, ड्रॉप, स्मॅश अशा प्रत्येक फटक्याचा खुबीने उपयोग करत चोंग वेईने दुसरा गेम जिंकत बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ३-३, ८-८ अशी बरोबरी होती. ली चोंग वेईने लिनच्या स्वैर फटक्यांचा फायदा उठवत आगेकूच केली. चोंग वेईने २०-१७ अशी आघाडी घेत चार मॅचपॉइंट कमावले. लिन डॅनने प्रदीर्घ रॅलीद्वारे मॅचपॉइंट वाचवला. २०-२० अशा बरोबरीनंतर लिन डॅनचा फटका नेटवर आदळला. मॅचपॉइंट मिळालेल्या ली चोंग वेईने ड्रॉपच्या अफलातून फटक्यासह बाजी मारली. सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे टीशर्ट अदलाबदली करत खेळभावनेचे अनोखे उदाहरण सादर केले.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत चीनच्या चेन लाँगने डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सलेनवर २१-१४, २१-१५ असा विजय मिळवला.