scorecardresearch

सायनाला चार महिने विश्रांती

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या गुडघ्यावर शनिवारी मुंबईत शस्त्रक्रिया झाली

सायनाला चार महिने विश्रांती

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या गुडघ्यावर शनिवारी मुंबईत शस्त्रक्रिया झाली असून, विश्रांतीच्या दृष्टीने तिला पुढील चार महिने स्पर्धापासून दूर राहावे लागणार आहे, अशी माहिती तिचे वडील हरविर सिंग यांनी दिली.

‘‘आम्ही कोकिळाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळाच्या डॉक्टरांना विनंती केली आहे की, आम्हाला लवकरच हैदराबादला जाण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तिच्या मैदानावरील पुनरागमनाची प्रक्रिया लवकरच होऊ शकेल,’’ असे सिंग यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘या शस्त्रक्रियेमुळे सायना जानेवारीतच मैदानावर परतण्याची शक्यता असल्यामुळे तिच्या कारकीर्दीला हा मोठा धक्का असेल. आता किती लवकर ती बरी होते, यावर हे सारे अवलंबून आहे.’’

शस्त्रक्रियेच्या प्रक्रियांमुळे पी. व्ही. सिंधूची ऑलिम्पिक स्पध्रेची अंतिम फेरी पाहता न आल्याची खंत हरविर यांनी या वेळी प्रकट केली. ते म्हणाले, ‘‘तो सामना आम्ही पाहू शकलो नाही. मात्र सिंधूने झुंजार खेळ केल्याचे वृत्तपत्रात वाचले. सायनाने कांस्यपदक जिंकल्यानंतर हैदराबादच्याच सिंधूने रौप्यपदक जिंकण्याची किमया साधणे, हे प्रेरणादायी आहे.’’

 

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक ( Rio-2016-olympics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या