भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सचिन तेंडुलकरचे बालपणीचे प्रशिक्षक, रमाकांत आचरेकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. २ जानेवारी २०१९ साली आचरेकर सरांचं वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. आजच्या दिवशी सचिन आपल्या आवडत्या आचरेकर सरांच्या आठवणींमुळे भावूक झाला असून, त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, तुमच्या आठवणी मनात सदैव राहतील ! असं म्हणत…आचरेकर सरांना आदरांजली वाहिली आहे.

आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केलं. आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत.

वर्षभरापूर्वी आचरेकर सरांची तब्येत खालावली होती. त्यांना जेवताना त्रास होत असल्यामुळे, अन्न पातळ करुन भरवलं जात होतं. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या आचरेकर सरांच्या आवडत्या शिष्यांनी वर्षभरापूर्वी क्रिकेट अकादमी सुरु करायच्या आधी सरांचे आशिर्वाद घेण्यासाठी भेट घेतली होती, त्यांची ती भेट अखेरची ठरली होती.