इंझमाम उल हक याने पाकिस्तान क्रिकेट संघाचे दीर्घकाळ यशस्वी नेतृत्व केले. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, अनिल कुंबळे, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन यांसारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करत त्याने आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवला. काही दिवसांपूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल घडवणारे क्रिकेटपटू कोण? याबाबतच्या प्रश्नाचे इंझमामने व्हिडीओद्वारे उत्तर दिले होते. आता त्याने आणखी एक व्हिडीओ तयार केला असून त्यात इंझमामने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

“सचिन तेंडुलकर हा एक असा क्रिकेटपटू आहे, जो केवळ क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला होता. मला कायम असं वाटायचं की क्रिकेट आणि सचिन हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. सचिन हा सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. सचिनने १६-१७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याने अतिशय धमाकेदार खेळी करून दाखवल्या. अशा प्रकारचा खेळ केवळ प्रतिभावंत खेळाडूलाच करता येऊ शकतो. जर सर्वोत्तमच्याही वरील कोणता दर्जा असेल तर सचिन त्या दर्जाचा खेळाडू आहे”, अशा शब्दात इंझमामने सचिनची प्रशंसा केली.

“सचिनचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा पाकिस्तानचा होता. १६ – १७ वर्षांच्या सचिनसमोर वसिम अक्रम, वकार युनिस आणि इम्रान खान यांसारख्या वेगवान आणि धोकादायक वेगवान गोलंदाजांची फौज होती. पण सचिनने त्या गोलंदाजांचा सामना करत आपल्या फलंदाजीतील प्रतिभा साऱ्या जगाला दाखवून दिली”, असेही इंझमाम म्हणाला.

“या’ तीन खेळाडूंनी क्रिकेटचा चेहरा बदलला”

काही दिवसांपूर्वी इंझमामने क्रिकेटच्या इतिहासात ३ क्रिकेटपटूंनी क्रिकेटला नवी दिशा आणि शैली दिली, असे मत व्यक्त केले होते. त्या क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटूला स्थान देण्यात आले नव्हते. वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर व्हिव्ह रिचर्ड्स, श्रीलंकेचा आक्रमक डावखुरा सलामीवीर सनथ जयसुर्या आणि मिस्टर ३६० एबी डीव्हिलियर्स या तिघांची नावे इंझमामने व्हि़डीओत घेतली होती.