क्रिकेट हा जगातील एक लोकप्रिय खेळ आहे. जगातील अनेक देश क्रिकेट खेळतात. कालानुरूप हे क्रिकेट बदलत गेले आहे. क्रिकेटमध्ये हवे असलेले बदल करण्यात अनेक क्रिकेटपटूंनी योगदान दिले. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक याने क्रिकेटचा चेहरामोहरा बदलाणाऱ्या अशाच तीन खेळाडूंची नावे सांगितली आहेत. क्रिकेटच्या इतिहासात ३ क्रिकेटपटूंनी क्रिकेटला नवी दिशा आणि शैली दिली, असे मत इंझमाम याने व्यक्त केले आहे.

“सर्वप्रथम वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर व्हिव्ह रिचर्ड्स यांनी क्रिकेटमध्ये बदल घडवून आणला. ते जगातील आक्रमक फलंदाजांपैकी होते. १९८० च्या दशकात त्यांच्या फलंदाजीची दहशत होती. व्हिव्ह रिचर्ड्स यांनी क्रिकेट बदलून टाकले. जेव्हा फलंदाज वेगवान गोलंदाजांना बॅकफूटवर खेळायचे, त्या काळात त्यांनी साऱ्यांना फ्रंटफूटवर येऊन कसे खेळावे ते दाखवून दिले. वेगवान गोलंदाजांवरही हल्लाबोल करता येऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. ते क्रिकेटमधील महान खेळाडू आहेत”, असे इंझमाम म्हणाला.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स

“व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यानंतर ज्याने क्रिकेट बदलण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे श्रीलंकेचा आक्रमक डावखुरा सलामीवीर सनथ जयसुर्या. पहिल्या १५ षटकात वेगवान गोलंदाजांवर आक्रमण करता येऊ शकते हे त्याच्यामुळे क्रिकेटला समजले. त्याच्या आधीच्या काळात जो फलंदाज हवेत चेंडू मारत असे, त्याला चांगला फलंदाज समजत नसत. पण त्याने मात्र आक्रमक फलंदाजीची व्याख्या काय असावी ते दाखवून दिले. अधिक फिल्डर ३० यार्ड वर्तुळात असताना चांगली फटकेबाजी कशी करावी हे पहिल्यांदा त्याने दाखवले”, असे इंझमामने नमूद केले.

सनथ जयसूर्या

“क्रिकेटमध्ये उल्लेखनीय बदल घडवून आणणारा तिसरा खेळाडू म्हणजे एबी डीव्हिलियर्स. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट वेगवान करण्याचे श्रेय मी त्याला देईन. त्याच्या आधीच्या पिढीतील फलंदाज जमेल तेवढे सरळ बॅटने खेळत होते. त्याने विविध पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप सारखे शॉट खेळायला सुरूवात करून क्रिकेट बदलले”, असे इंझमाम उल हकने सांगितले.