भारताचे अव्वल दर्जाचे खेळाडू सायना नेहवाल व कदम्बी श्रीकांत यांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदासाठी खडतर कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. सायना व श्रीकांत यांनी नुकत्याच झालेल्या चीन सुपर सीरिजमध्ये विजेतेपद मिळविले असल्यामुळे त्याचा फायदा त्यांना मिळणार आहे, तरीही जगातील अव्वल आठ खेळाडूंमध्ये ही स्पर्धा होत असल्यामुळे विजेतेपद मिळविणे सोपे नाही. दुबईत प्रथमच ही स्पर्धा होत असल्यामुळे चाहत्यांना रंगतदार लढती पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
महिलांच्या साखळी गटात सायना हिला चीनची शियान वांग, दक्षिण कोरियाच्या जेई हियान संग आणि येओन जु बेई यांच्याशी खेळावे लागणार आहे.
सायनाच्या तुलनेत श्रीकांतला साखळी गटात थोडासा सोपा पेपर आहे. मात्र प्रत्येक खेळाडूमध्ये अनपेक्षित विजय नोंदविण्याची क्षमता असल्यामुळे त्यालाही येथे सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. त्याला डेन्मार्कचा जान ओ जॉर्गेन्सन, जपानचा केन्तो मोमोतो व इंडोनेशियाचा टॉमी सुगिआतरे यांचे आव्हान असणार आहे.
दोन्ही विभागांत प्रत्येक गटातील पहिले दोन खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असल्यामुळे सायना व श्रीकांत यांना सर्वोत्तम कौशल्याचा प्रत्यय घडवावा लागणार आहे. सायना हिने शिक्सियनविरुद्ध पाच सामने जिंकले आहेत तर पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. गेल्या पाच लढतींपैकी चार लढतींमध्ये सायना विजयी झाली आहे. संग हिला तिने चार वेळा हरविले आहे तर एकदा सुंग विजयी झाली आहे. बेई हिच्याविरुद्ध सायना सहा वेळा विजयी झाली आहे तर चार वेळा बेई हिने विजय मिळविला आहे. गतवेळी सायना हिला केवळ एकच सामना जिंकता आला होता व तिचे आव्हान साखळी गटातच संपले होते.
दहा लाख डॉलर्स पारितोषिकाच्या या स्पर्धेच्या तयारीविषयी सायना म्हणाली, ‘‘गतवेळच्या स्पर्धेपेक्षा यंदा मी खूप तयारी केली आहे. नशिबाची साथ मिळाली पाहिजे. जगातील सर्वात तुल्यबळ खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. वाँग यिहानपेक्षा शिक्सियनविरुद्ध खेळणे सोपे आहे. अर्थात शियान हीदेखील बलाढय़ खेळाडू आहे. प्रत्येक गुणासाठी झगडावे लागणार आहे. पूर्ण ताकदीनिशी खेळ करण्याचे माझे ध्येय आहे.’’
महिलांच्या दुसऱ्या गटातही माजी विजेत्या वाँग यिहान, थायलंडची रात्नोचोनोक इन्तानोन, चीन तेपैईची तेई तिझु यिंग, जपानची युवा खेळाडू अकेने यामागुची या तुल्यबळ खेळाडूंचा समावेश असल्यामुळे हे सामनेही चुरशीने खेळले जातील.
जागतिक सुपर सीरिजसाठी पात्र ठरलेला श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने यापूर्वी जॉर्गेन्सन व मोमोतो यांच्यावर मात केली आहे. मात्र त्याला सुगिआतरे याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साखळी ‘अ’ गटात विश्वविजेता चेन लाँग (चीन), सोन वानहो (दक्षिण कोरिया), केनिची तागो (जपान), हान्स क्रिस्तियन व्हिटिंघास (डेन्मार्क) या बलाढय़ खेळाडूंचा समावेश आहे. साखळी गटात या खेळाडूंशी खेळावे लागणार नसल्यामुळे श्रीकांतने सुस्कारा टाकला आहे.