आधुनिक क्रिकेटमध्ये सचिनसारखा फलंदाज शोधून सापडणार नाही, तो अद्वितीय असाच होता. कारण प्रत्येक क्रिकेटच्या प्रकाराला त्याने स्वत:शी जुळवून घेतले होते. काही फलंदाज त्याच्या महानतेच्या जवळपासही गेले. सध्याच्या क्रिकेटजगतामध्ये श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज कुमार संगकारामध्ये त्याच्यासारखे गुण दिसतात. ते दोघेही माझ्यालेखी महान खेळाडूच आहेत, असे मत वेस्ट इंडिजचे महान तडाखेबंद फलंदाज व्हिव रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे.
‘‘प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात आणि जो या तडजोडी करतो तोच यशस्वी ठरतो. त्यामुळेच सचिन क्रिकेटच्या भिन्न प्रकारांमध्ये यशस्वी ठरला. सचिनकडे असलेली ही गोष्ट काहीशी संगकारामध्येही दिसते,’’ असे रिचर्ड्स यांनी आपल्या लेखामध्ये म्हटले आहे.
रिचर्ड्स पुढे म्हणाले की, ‘‘सचिन आणि संगकारा हे दोन्ही फलंदाज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये यशस्वी ठरले. कारण त्यांनी खेळाच्या प्रकारानुसार आपल्या फलंदाजीचा पोत बदलला. जर तुमचे खेळावर प्रेम असेल तर तुमच्याकडून या गोष्टी घडतात आणि तुम्ही यशस्वी ठरता. सध्या क्रिकेट खेळणारे बहुतांशी फलंदाज त्यांचासारखा विचार करत नाहीत असेच मला वाटते.
सध्याच्या फलंदाजांबद्दल रिचर्ड्स म्हणाले की, ‘‘सध्याच्या फलंदाजांवर काही शिक्के आपण बघतो. हा कसोटीचा फलंदाज आहे किंवा हा एकदिवसीय क्रिकेटचा फलंदाज आहे किंवा हा फलंदाज ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येच चांगली कामगिरी करतो. मला हे सारे हास्यास्पद वाटते. फलंदाजाने आपल्यावर असे शिक्के बसू नयेत, याची काळजी घ्यायला हवी.’’