Sarafaraz Ahmed Appointed As Director Of Cricket: पाकिस्तानात कधी काय होईल, याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. ज्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही, अशा खेळाडूकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पाकिस्तानला २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चॅम्पियन बनवणाऱ्या सरफराज अहमदने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. पण निवृत्ती न घेताच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
रोहामध्ये एशिया कप रायझिंग स्टार्स २००२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान शाहिन्स (पाकिस्तान अ) संघाने भारतीय अ संघावर विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तान शाहिन्स संघाने स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आता सरफराज अहमद या संघाला मार्गदर्शन करताना दिसून येणार आहे. ३८ वर्षीय सरफराज अहमदची पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील आणि पाकिस्तान अ संघाचा डायरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पीसीबीच्या सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, सरफराज अहमदकडे पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील आणि पाकिस्तान अ संघातील खेळाडूंना घडवण्यासह आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघाच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी संघाचे प्रशिक्षक, निवडकर्ते आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य देखील सरफराज अहमदला रिपोर्ट करणार आहेत. या जबाबदाऱ्या निवृत्ती जाहीर केलेल्या अनुभवी खेळाडूंकडे सोपवल्या जातात. सरफराज अहमदने अजूनही निवृत्तीची घोषणा केलेली नाही. पण पीसीबीने या जबाबदाऱ्या सोपवून सरफराजला जाणीव करून दिली आहे, की आता पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही.
सरफराज अहमदची कारकिर्द
सरफराज अहमदच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठं यश म्हणजे, २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्याला पाकिस्तानकडून ५४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यन त्याने ३०३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतकं आणि २१ अर्धशतकं झळकावली आहेत. यासह ११७ वनडे सामन्यांमध्ये त्याच्या नावे २३१५ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ११ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-०२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ६१ सामन्यांमध्ये ८१८ धावा करण्याची नोंद आहे.
