स्कॉटलंडने रचला इतिहास, वनडेतील नंबर एक संघाला पराभवाचा धक्का

कॅलम मॅकलियोडच्या शानदार १४० धावांच्या खेळीच्या जोरावर ५ गडीबाद ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता

स्कॉटलंडने एडिनबर्ग येथे झालेल्या एकमेव एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा ६ धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. स्कॉटलंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने कॅलम मॅकलियोडच्या शानदार १४० धावांच्या खेळीच्या जोरावर ५ गडीबाद ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात ३६५ धावा बनवून इंग्लंडचा संघ गारद झाला आणि ६ धावांनी त्यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. शानदार खेळीसाठी मॅकलियोडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

इंग्लंडच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता, पण त्यांचा हा निर्णय स्कॉटलंडच्या सलामीच्या जोडीने चुकीचा ठरवला. स्कॉटलंडचा कर्णधार आणि सलामीवीर काइल कोट्ज़र (४९ चेंडू ५८) आणि मॅथ्यू क्रॉस (३९ चेंडू ४८) यांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर मैदानावर आलेल्या कॅलम मॅकलियोडने ९४ चेंडूंमध्ये १६ चौकार आणि ३ षटकार ठोकून १४० धावांची शानदार खेळी केली. त्याने रिची बेरिंगटनसोबत (३९) तिसऱ्या विकेटसाठी ९३ आणि जॉर्ज मुंसे (५५) याच्यासह चौथ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचली. त्याच्या या खेळीमुळे स्कॉटलंडने ३७१ धावांचा डोंगर रचला. ही स्कॉटलंडची आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्याही ठरली. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव टाकता आला नाही, त्यांचे सर्वच गोलंदाज महागडे ठरले. इंग्लंडकडून आदिल राशिद आणि लियम प्लंकेट यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

३७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडसाठी जॉनी बेअरस्टोने अवघ्या ५९ धावांमध्ये १०५ धावांची धुवांधार खेळी केली, आणि चांगली सुरूवात करुन दिली. त्याने कारकिर्दितील पाचवं आणि सलग तिसरं शतक झळकावलं. जॉनी बेअरस्टोने पहिल्या विकेटसाठी जेसन रॉयसोबत(३४) पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या एलेक्स हेल्स यानेही ५२ धावांची दमदार खेळी केली. पण त्यानंतर २२० धावांवर दोन गडी गेलेल्या इंग्लंडची अवस्था ३७ व्या षटकात २७६ धावांवर ७ गडीबाद अशी झाली. कर्णधार इयोन मॉर्गन (२०), जो रूट (२९) आणि सॅम बिलिंग्स (१२) फलंदाजीत चमक दाखवण्यात अपयशी ठरले. लियम प्लंकेटने (४७*) मोइन अली (४६) याच्यासह आटव्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या. पण ४६ व्या षटकात अली बाद झाल्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का बसला, त्यानंतर ४८.५ षटकात इंग्लंडचा पूर्ण संघ ३६५ धावांमध्ये गारद झाला. स्कॉटलंडकडून मार्क वॉट याने ३, एलिस्डेयर इवांस आणि रिची बेरिंग्टन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर शफ्यान शरीफने एक विकेट घेत संघाच्या विजयात हातभार लावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Scotland beat england for first time in international cricket