स्कॉटलंड यार्डातच ?

जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडचा एक भाग म्हणजे स्कॉटलंड. साहजिकच देशात क्रिकेटची संस्कृती रुजलेली.

जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडचा एक भाग म्हणजे स्कॉटलंड. साहजिकच देशात क्रिकेटची संस्कृती रुजलेली. मात्र क्रिकेट खेळणारा स्वतंत्र देश म्हणून स्कॉटलंडची ओळख लिंबू-टिंबू अशीच. स्कॉटलंडच्या क्रिकेटपटूंना इंग्लंडच्या काऊंटी अर्थात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची मुभा आहे. यामुळे त्यांचे बहुतांशी क्रिकेटपटू विविध काऊंटी संघातून खेळतात. प्रदर्शन चांगले झाल्यास या खेळाडूंचा इंग्लंडच्या संघासाठी विचार होतो. स्कॉटलंडच्या तुलनेत इंग्लंडसाठी निवड झाल्यास व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडवता येत असल्याने अनेक गुणी क्रिकेटपटूं इंग्लंडला पसंती देतात. इंग्लंडचा माजी कर्णधार माइक डेनेस, अष्टपैलू डगी ब्राऊन, कसोटीपटू गॅव्हिन हॅमिल्टन हे सगळे मूळचे स्कॉटलंडचे. मात्र गुणवत्तेला न्याय देण्यासाठी इंग्लंडमध्ये संधी असल्याने त्यांनी स्कॉटलंडला रामराम केला. फुटबॉल, रग्बीसह अन्य क्रिकेटेतर खेळांमध्ये स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणाऱ्या स्कॉटलंडला क्रिकेटमध्ये मात्र दुबळ्या संघांच्या पंक्तीतच वावरावे लागते.
अधिकृत नोंदीनुसार स्कॉटलंडमध्ये क्रिकेटचा पहिला सामना १७८५ साली झाला. मात्र नियमांच्या चौकटीनुसार असा पहिला सामना होण्यास ८० वर्षे लागली. स्कॉटिश क्रिकेट युनियनची स्थापना १८७९ साली झाली. देशातील क्रिकेट नियंत्रित करणाऱ्या संघटनेची स्थापना केल्यानंतर तीनच वर्षांत स्कॉटलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला नमवण्याची किमया साधली. १८८३ साली ही संघटना बरखास्त झाली. ग्रेन्ज क्रिकेट क्लबने कारभार ताब्यात घेतला. १९४८मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या दौऱ्याच्या शेवटी स्कॉटलंडमध्ये दोन सामने खेळले. क्रिकेटचा महामेरू डॉन ब्रॅडमन यांनी या दोन सामन्यांद्वारे क्रिकेटला अलविदा केला. १९८०पासून स्कॉटलंडचा इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये प्रवेश झाला. यामुळे त्यांच्या क्रिकेटपटूंना नियमित खेळण्याची संधी मिळू लागली. १९९४ हे स्कॉटलंड क्रिकेटसाठी निर्णायक वर्ष ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संलग्न देश म्हणून स्कॉटलंडला मान्यता दिली.
पात्रता फेऱ्यांचे अडथळे पार करत स्कॉटलंडने १९९९च्या विश्वचषकाचे तिकीट मिळवले. मात्र हा अनुभव त्यांच्यासाठी निराशाजनकच ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी १८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. पाकिस्तानने त्यांच्याविरुद्ध २६१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्कॉटलंडचा डाव १६७ धावांतच आटोपला. बांगलादेशविरुद्ध स्कॉटलंडला चमक दाखवण्याची संधी होती. भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी बांगलादेशचा डाव १८५ धावांतच रोखला. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा डाव १६३ धावांतच गडगडला आणि त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. मग वेस्ट इंडिजच्या तेजतर्रार माऱ्यासमोर खेळताना स्कॉटलंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली आणि त्यांचा डाव ६८ धावांतच संपुष्टात आला. वेस्ट इंडिजने दोन विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केले. त्यानंतर ख्रिस हॅरिसच्या किफायतशीर गोलंदाजीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांचा डाव १२१ धावांतच संपुष्टात आला. न्यूझीलंडने सहजगत्या हे लक्ष्य पूर्ण केले. अव्वल दर्जाच्या संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव नसल्याने स्कॉटलंडला पाचही लढतीत पराभूत व्हावे लागले. मात्र प्रत्येक सामन्यात त्यांनी संघर्ष करण्याची जिद्द दाखवली. आयसीसीतर्फे आयोजित होणाऱ्या आंतरखंड आणि पात्रता फेरीच्या स्पर्धेत सातत्य न राखता आल्याने स्कॉटलंडला २००३च्या विश्वचषकासाठी पात्र ठरता आले नाही.
पुन्हा चार वर्षे विजनवासात गेलेल्या स्कॉटलंडने नेटाने प्रयत्न करत कॅरेबियन बेटांवर झालेल्या २००७च्या विश्वचषकाचे तिकीट मिळवले. दुर्दैवाने सलामीच्या लढतीत त्यांच्यासमोर जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. कांगारूंनी ३३४ धावांचा डोंगर उभारला आणि त्यानंतर स्कॉटलंडला १३१ धावांतच रोखले. दक्षिण आफ्रिकेने स्कॉटलंडला १८६ मजल मारू दिली आणि ७ विकेट्स राखून हे लक्ष्य गाठले. समदु:खी नेदरलँड्सविरुद्ध कर्तृत्व सिद्ध करण्याची स्कॉटलंडला संधी होती. मात्र नेदरलँड्सने स्कॉटलंडचा डाव १३६ धावांत गुंडाळला आणि २ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण केले. विश्वचषकाची संरचना बदलल्यामुळे तीन लढती खेळूनच स्कॉटलंडला गाशा गुंडाळावा लागला. स्कॉटलंडचे बहुतांशी खेळाडू हे नोकरी-व्यवसाय हे व्याप सांभाळून खेळतात. नियमित सरावाचा अभाव, अव्वल संघांविरुद्ध खेळायला न मिळणे, सामने आणि मालिकांची तुटपुंजी संख्या तसेच आर्यलड, नेदरलँड्स, कॅनडा, केनिया या संलग्न देशांनी आपली कामगिरी उंचावल्याने स्कॉटलंडला आशियाई उपखंडात झालेल्या २०११च्या विश्वचषकासाठी पात्रच ठरता आले नाही. मात्र या सर्व कटू आठवणी बाजूला ठेवत त्यांनी यंदाच्या विश्वचषकासाठी तयारी सुरू केली. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, केनिया, नामिबिया, कॅनडा, पापुआ न्यू गिनी, हाँगकाँग, नेपाळ आणि युगांडासह स्कॉटलंडचा समावेश होता. या स्पध्रेत स्कॉटलंडने संयुक्त अरब अमिरातीवर मात करत २०१५ची विश्वचषक वारी पक्की केली. या विजयासह स्कॉटलंडने २०१८पर्यंत एकदिवसीय खेळण्याचा दर्जाही कायम राखला.

बलस्थान आणि कच्चे दुवे
इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटचा अनुभव ही स्कॉटलंडच्या खेळाडूंची पुंजी म्हणायला हवी. या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची आणि त्यांच्यासह खेळण्याची, शिकण्याची संधी त्यांना वारंवार मिळते. आयसीसीतर्फे आयोजित संलग्न देशांच्या स्पर्धामध्ये स्कॉटलंडने दर्जेदार कामगिरी केली आहे. कर्णधार प्रेस्टन मोमसेन, कॅल्युम मॅकलोइड यांच्यावर स्कॉटलंडच्या फलंदाजीची भिस्त आहे. इयान वॉर्डलाचा अष्टपैलू खेळ स्कॉटलंडसाठी जमेची बाजू आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ा स्कॉटलंडच्या गोलंदाजांना साहाय्यकारी आहेत. मात्र गटातले मातब्बर संघ पाहता स्कॉटलंडच्या फलंदाजांची कसोटी असणार आहे.
 संकलन : पराग फाटक

अपेक्षित कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आणि विश्वचषकाचा अनुभव असलेल्या स्कॉटलंडला साखळी लढतींमध्ये अफगाणिस्तानवर विजय मिळवण्याची संधी आहे. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड या संघांविरुद्ध स्कॉटलंडची परीक्षा असणार आहे. गतकामगिरी पाहता स्कॉटलंडचा प्रवास साखळी फेरीपुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

स्कॉटलंड
(अ-गट)
क्रमवारीतील स्थान :  १३
सहभाग :  १९९९, २००७मध्ये पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात

संघ : प्रेस्टन मोमसेन (कर्णधार), कायले कोट्झर, रिची बेरिंग्टन, फ्रेडी कोलमन, मॅथ्यू क्रॉस, जोश डॅव्हे, अलासडेअर इव्हान्स, हॅमीश गार्डिनर, माजीद हक, मायकेल लिस्क, मॅट मचान, कॅल्युम मॅकलोइड, सफायान शरीफ, रॉब टेलर, इयन वॉर्डलॉ.
प्रशिक्षक : ग्रेट ब्रॅडबर्न
साखळीतील सामने :
१७ फेब्रुवारी : वि. न्यूझीलंड
२३ फेब्रुवारी : वि. इंग्लंड
२६ फेब्रुवारी : वि. अफगाणिस्तान
५ मार्च : वि. बांगलादेश
११ मार्च : वि. श्रीलंका
१४ मार्च : वि. ऑस्ट्रेलिया

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Scotland trip for world cup