प्रत्येक कुटुंबात कर्तेपण भूषवणारे व्यक्तिमत्त्व असते. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या शिरावर घेऊन त्या समर्थपणे पार पाडण्याच्या क्षमतेमुळे ही व्यक्ती त्या कुटुंबाचा जणू अघोषित आधारस्तंभ होऊन जाते. ऑलिम्पिक असो, राष्ट्रकुल असो किंवा नुकतीच सुरू झालेली आशियाई क्रीडा स्पर्धा असो; असंख्य खेळ आणि खेळाडूंना सामावून घेणाऱ्या भारतीय पथकात कर्तेपणाची जबाबदारी नेमबाजीचा चमूकडे अघोषितपणे येते. लंडन, ग्लास्गो आणि आता इन्चॉनमध्येही सर्वाधिक अपेक्षा आहेत त्या नेमबाजांकडूनच! अपेक्षांचे ओझे एरवी अनेकदा खेळाडूंना विचलित करते, त्यांची कामगिरी खालावते. तसं पाहाता, हरण्यासाठी कोणीच खेळत नाही. प्रत्येक जण जीव ओतूनच खेळतो; पण पदकाचा टिळा माथी लागला नाही तर सगळे चित्र विस्कटते. नेमबाजपटूंच्या बाबतीत मात्र असे होत नाही. लक्ष्यावर एकाग्रतेने नेम धरत आणि गोळ्यांनी अचूक मर्मभेद करत ते पदकांसह भारताचा झेंडाही उंचावतात.  विशेष म्हणजे क्रिकेटसारखे खेळ हे व्यक्तिकेंद्रित होत असताना आणि त्यातील अपेक्षांचे ओझेही एकटय़ादुकटय़ा खेळाडूवर लादले जात असतानाच नेमबाजीच्या क्षेत्रात मात्र कर्तृत्ववान नेमबाजांची फौज सातत्याने निर्माण झाली आहे. बिकानेरचे महाराज असलेले डॉ. कर्णी सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मोहोर प्रथम उमटवली. राजश्रीकुमारी, भुवनेश्वरी कुमार आणि कोटय़ाचे महाराव भीमसिंग तसेच उदयन चिनूभाई यांनी सातत्यपूर्ण खेळाची परंपरा जपली. सलग सहा वेळा ऑलिम्पिकवारी करण्याचा मान राजा रणधीर सिंग यांनी मिळवला. १९६४ ते १९८४ या कालावधीत अशोक पंडित, सोमा दत्ता, मनशेर सिंग यांनी भारताची पताका फडकावली. अंजली भागवत, दीपाली देशपांडे आणि सुमा शिरुर या महाराष्ट्राच्या लेकींनी क्रिकेटचा महापूर असतानाही या वेगळ्या वाटेवर पायाभूत सुविधांची साथ नसतानाही यश मिळवले.
या सगळ्या पायाभरणीवर कळस चढवला तो अभिनव बिंद्राने. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत अभिनवने इतिहास घडवला. या पदकाने नेमबाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. दमदार प्रदर्शनासाठी हक्काने विश्वास ठेवावा असा क्रिकेटेतर खेळ अशी ओळख नेमबाजीने निर्माण केली. या विश्वासामुळेच शस्त्र, साहित्य, प्रशिक्षण आणि सराव यासाठी नेमबाजांना सरकारकडून भरघोस निधी मिळू शकला त्याचबरोबर नेमबाजी शिकण्याकडे ग्रामीण तसेच शहरी भागांतूनही तरुणांचा प्रवाह वळू लागला. या विश्वासाला जागत नेमबाजपटूंनीही आपली कामगिरी सातत्याने उंचावतच नेली आणि वेळोवेळी पदकांची लयलूट करत सरकारची आर्थिक पाठराखण सार्थ ठरविली.
सरकारी पातळीवर प्रोत्साहन मिळत असतानाच स्वयंसेवी संस्थांनीही या खेळासाठी पुढाकार घेतला. मित्तल ट्रस्ट, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, लक्ष्य अशा उपक्रमांनी नेमबाजांचे प्रशिक्षण, सराव आणि दुखापतींचे व्यवस्थापन यासाठी सढळहस्ते निधी उपलब्ध करून दिला. पदक मिळाल्यावर विविध मार्गानी मदत उपलब्ध होते, मात्र पदकासाठी मेहनत सुरू असताना साथ मिळत नाही, ही अडचण लक्षात घेऊन नेमबाजांना महत्त्वाच्या स्पर्धापूर्वीच अशी मदत मिळू लागल्याने कर्तेपण निभावता येत आहे.
घरातच शूटिंग रेंज असणारा अभिनव बिंद्रा, स्वत: खेळत असतानाच युवा खेळाडूंसाठी नेमबाजी केंद्र चालवणारा गगन नारंग, नेपाळमधून भारतात येऊन लष्करी सेवेत दाखल झालेला जितू राय, शालेय शिक्षण सोडून नेमबाजीची आवड जोपासणारी मलायका गोयल, इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेली श्वेता चौधरी, घरातून खेळाची परंपरा नसताना पिस्तूल नेमबाजी हा ध्यास झालेली राही सरनोबत ही आणि अशी असंख्य उदाहरणे नेमबाजीत आहेत. या सगळ्यांच्या आर्थिक, सामाजिक पाश्र्वभूमीत कोणतेही साम्य नाही; पण हे सगळे व्यापक अशा भारतीय नेमबाज कुटुंबाचे घटक आहेत. नेमबाजीचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या उपकुटुंबाचे कर्तेपण जपतो आहे. नेमबाजीबद्दल देशात वाढत असलेली जागरूकता, सरकारी तसेच खासगी शूटिंग रेंजची झालेली निर्मिती आणि योग्य वेळी मिळणारा पाठिंबा या बळावर या मातीतील तरुणाईने पदकांवर अचूक नेम साधला आहे, तो नित्यनेमाने टिकून राहील, हा सार्थ विश्वास!