भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांना विश्वास

मुंबई : पी. व्ही. सिंधू ही एक अव्वल दर्जाची खेळाडू असून टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी ती नक्कीच दमदार पुनरागमन करेल, असा आशावाद भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी व्यक्त केला.

मुबंईत झालेल्या ‘बॅडमिंटन गुरुकुल’ या अकादमीच्या अनावरण सोहळ्यासाठी गोपिचंदव्यतिरिक्त माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपटसुद्धा उपस्थित होत्या.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर एकाही स्पर्धेची किमान उपांत्य फेरी गाठणे जमलेले नाही. तसेच नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्यातही सिंधूला तिचे जेतेपद टिकवण्यात अपयश आले. त्यामुळेच तिच्या कामगिरीविषयी सगळेच चिंता करत आहेत.

‘‘सिंधू ही भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आहे. सध्या ती बऱ्याच काळापासून अपयशाला सामोरी जात असली तरी लवकरच यातून स्वत:ला सावरत ती पुनरागमन करेल. फक्त तिच्या खेळांत काही सुधारणांची आवश्यकता असून आम्ही त्यावर मेहनत घेत आहोत,’’ असे ४६ वर्षीय गोपिचंद म्हणाले.

सिंधूच्या अपयशामागे सततच्या स्पर्धाही कारणीभूत आहेत, असे गोपिचंद यांनी नमूद केले. ‘‘एकामागे एक स्पर्धा खेळल्यामुळे खेळाडूंना सरावासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. तसेच ऑलिम्पिक पात्रतेसाठी या सर्व स्पर्धा ‘बीडब्ल्यूएफ’ने खेळणे सक्तीचे केल्यामुळे खेळाडू माघारही घेऊ शकत नाहीत,’’ असे गोपिचंद यांनी सांगितले.

याव्यतिरिक्त, लक्ष्य सेन, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या युवा खेळाडूंच्या कामगिरीचेही गोपिचंद यांनी कौतुक केले. ‘‘लक्ष्यने या संपूर्ण वर्षांत सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. क्रमवारीत पहिल्या ३० खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्यास तोसुद्धा वरिष्ठ गटाच्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकेल. तसेच सात्त्विक-चिरागही दिवसेंदिवस प्रगती करत असून त्यांच्याकडून प्रत्येक स्पर्धेत चाहते विजेतेपदाची आशा करतात,’’ असे गोपिचंद यांनी सांगितले.

भारतातील प्रशिक्षकांच्या गरजा पूर्ण होतील!

बॅडमिंटन गुरुकुलमुळे भारताला अनेक उदयोन्मुख खेळाडूंबरोबरच प्रशिक्षकही लाभतील, अशी आशा गोपिचंद यांनी बाळगली आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनपटूंचा दबदबा वाढत आहे. त्याशिवाय बॅडमिंटन गुरुकुलसारख्या उपक्रमांमुळे आपल्या प्रशिक्षकांच्या गरजाही पूर्ण होतील,’’ असे गोपिचंद म्हणाले.