South Africa team Celebration With ICC Trophy Video: तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत ५ गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने २८ वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद या विजयासह पटकावले आहे. एडन मारक्रमचं शतक, कगिसो रबाडाची भेदक गोलंदाजी आणि आफ्रिकेच्या प्रत्येक खेळाडूचं अमूल्य योगदान या विजयात महत्त्वाचं ठरलं.

दक्षिण आफ्रिकेने या विजयासह क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटचा पहिला वर्ल्डकप जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि सलामीवीर एडन मारक्रम. रबाडाने सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आणि मारक्रमने चौथ्या डावात शानदार १३६ धावा केल्या. कर्णधार तेंबा बावुमानेही हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजताना उत्कृष्ट ६६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मानाची गदा पटकावली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाच्या नेतृत्त्वाखाली एकही कसोटी सामना संघाने यंदा गमावलेला नाही. तेंबा बावूमाने संघाच्या मोठ्या विजयानंतर मान खाली करत शांतपणे विजयाचा आनंद साजरा केला.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते विजयी कर्णधार तेंबा बावूमाला WTCची ट्रॉफी देण्यात आली. ट्रॉफी मिळाल्यानंतर संपूर्ण संघाने एकच जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. पोडियमवर खेळाडू गाणं बोलत विजय साजरा करताना दिसले. संपूर्ण सपोर्ट स्टाफही पोडियमवर आला. यानंतर कोचच्या हातात ट्रॉफी देत त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. यानंतर कोचने सर्वात मागे असलेल्या मारक्रमला पुढे बोलावलं. तो आला हे पाहताच त्यांनी त्याची टीशर्ट खेचली आणि त्याला पुढे घेत त्याच्या हातात ट्रॉफी दिली.

मारक्रमने ट्रॉफी उंचावताच सर्वांनी एकच जल्लोष केला. यानंतर कगिसो रबाडाच्या हातात ट्रॉफी दिली गेली आणि संघाने या विजयाचा आनंद साजरा केला. संपूर्ण संघ ट्रॉफीसह नाचतानाही दिसला. या क्षणाचे फोटो, व्हीडिओही व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.