घरच्या मैदानावर अपराजित राहण्याची परंपरा कायम राखणाऱ्या न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीत रोखण्याची अवघड कामगिरी श्रीलंका संघासमोर आहे. श्रीलंकेच्या स्वागताला हिरवीगार खेळपट्टी तयार करण्यात आल्याने त्यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत. हाताच्या बोटाला झालेली दुखापत झालेली असूनही केन विल्यमसन या कसोटीत खेळणार आहे. खेळपट्टी पोषक असल्याने नील वॅगनर, डग ब्रेसवेल, टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट या चौकडीवर न्यूझीलंडची भिस्त आहे. पहिल्या कसोटीतील शतकवीर मार्टिन गप्तीलकडून न्यूझीलंडला मोठय़ा अपेक्षा आहेत. अँजेलो मॅथ्यूजच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंकेला कामगिरीत अमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. नव्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला विजयपथावर नेण्याचे आव्हान मॅथ्यूजसमोर असणार आहे. कौशल सिल्व्हाला संधी मिळण्याची शक्यता आहे.