श्रीलंका-न्यूझीलंड क्रिकेट मालिका

कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरू थिरिमाने या डावखुऱ्या सलामीवीरांनी नोंदवलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या बळावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विक्रमी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने बिनबाद १३३ धावा केल्या असून विजयासाठी त्यांना फक्त १३५ धावांची आवश्यकता आहे. करुणारत्ने दोन चौकारांच्या साहाय्याने ७१ (१६८ चेंडू), तर थिरिमाने चार चौकारांसह ६७ (१३२ चेंडू) धावांवर खेळत आहे. गॉल स्टेडियमवर दुसऱ्या डावात आजपर्यंत कोणत्याही संघाकडून १००हून अधिक धावांचा एकदाही यशस्वी पाठलाग झालेला नाही. त्यामुळे श्रीलंकेला २६८ धावांचे लक्ष्य गाठून हा पराक्रम करण्याची संधी आहे.

तत्पूर्वी, बी. जे. वॉटलिंगच्या (७७) झुंजार अर्धशतकाच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २८५ धावांपर्यंत मजल मारली. विल्यम सोमरव्हिलने (नाबाद ४०) उपयुक्त योगदान दिले. श्रीलंकेतर्फे लसिथ एम्बुलदेनियाने चार, तर धनंजय डीसिल्व्हाने तीन बळी मिळवले.