राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या दमदार खेळामुळे पांचगणी व्यायाम मंडळातर्फेआयोजित करण्यात आलेल्य्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचा चौथा दिवस गाजला. व्यावसायिक पुरुष विभागात मुंबई बंदर आणि एअर इंडिया यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे, तर महिलांमध्ये एम. डी. स्पोर्ट्स क्लब आणि शिवाई क्रीडा मंडळ या दोन पुण्याच्या संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे.
पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सचिन पाटील आणि योगेश झुडाच्या चतुरस्र चढायांच्या बळावर एअर इंडियाने मध्य रेल्वेवर २५-७ अशी आरामात मात केली. एअर इंडियाच्या गिरीश इरनाकने नेत्रदीपक पकडी केल्या. पराभूत संघाकडून गणेश तोडळेने झुंजार खेळ केला. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत विष्णू जाधवच्या लाजवाब पकडींच्या बळावर मुंबई बंदर संघाने मुंबई पोस्टल संघावर २४-९ अशी सहज मात केली. मुंबई पोस्टलकडून प्रांजल पवारने अप्रतिम खेळ केला.
अनुभवी खेळाडू शीतल मारणेच्या चढाया आणि शिवनेरी चिचकरच्या पकडींच्या बळावर शिवाई क्रीडा मंडळाने राणी लक्ष्मीबाई संघाचा २४-१६ असा पराभव करत अंतिम फेरीत गाठली. पराभूत संघाकडून लता चव्हाणने एकाकी लढत दिली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात एम. डी. स्पोर्ट्स क्लबने सुवर्णयुगला २४-१२ असा पराड्टावा धक्का दिला तो लविना गायकवाडच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर. एमडीच्या विजयात पूजा सूर्यवंशीच्या पकडींनीही मोलाची भूमिका बजावली, तर दुसऱ्या सत्रात प्राजक्ता तापकीरने एका चढाईत तीन गुण कमवले. सुवर्णयुगकडून ईश्वरी कोंडाळकर आणि दिक्षा जोशी यांनी चढायांचा लाजवाब खेळ करीत सामना वाचवण्याचा प्रयत्न केला.