बंगळुरूला आठ धावांनी नमवून प्रथमच आयपीएल जेतेपदाला गवसणी;
वॉर्नरचे अर्धशतक, बेन कटिंगची अष्टपैलू चमक; गेल, कोहलीची झुंज व्यर्थ

प्रतिस्पर्धी संघात कितीही अव्वल दर्जाचे फलंदाज असो, ते कितीही मर्दुमकी गाजवत असो, कितीही धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची क्षमता असो, पण ज्यांना स्वत:वर आणि संघातील खेळाडूंवर विश्वास असतो ते बोलून न दाखवता करून दाखवतात. नेमके हेच डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत करून दाखवले. डेव्हिड वॉर्नरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने २०८ धावांचे आव्हान उभे केले. ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज खेळी करतानाही शांत असलेल्या वॉर्नरने आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर हा सामना आपल्या बाजूने झुकवला. आयपीएलच्या नवव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात बंगळुरूवर ८ धावांनी विजय मिळवत हैदराबादने प्रथमच जेतेपदाला गवसणी घातली.
हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर तो योग्य असल्याचे दाखवून दिले. हैदराबादने शेन वॉटसनच्या पाचव्या षटकात दोन षटकार आणि एका चौकारासह १९ धावा वसूल केल्या. त्यानंतर वॉर्नर बंगळुरूच्या गोलंदाजांवर तुटून पडत होता. त्यावेळी दुसऱ्या टोकाकडून जास्त आक्रमण करायची गरज नसली तरी शिखर धवन (२८) आणि मोझेस हेनरिक्स (४) यांनी मोठे फटके खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. युजवेंद्र चहलच्या नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर डावातील पाचवा चौकार वसूल करत वॉर्नरने अर्धशतक झळकावले. एस. अरविंदचा उजव्या यष्टीबाहेर पडलेला उसळता चेंडू थर्ड मॅनला मारण्याचा प्रयत्न करताना वॉर्नर फसला आणि शॉर्ट थर्ड मॅनला उभ्या असलेल्या इक्बाल अब्दुल्लाने त्याचा झेल टिपला. वॉर्नरने फक्त ३८ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६९ धावांची दमदार खेळी साकारली. वॉर्नरनंतर युवराजने फटकेबाजीला सुरुवात करत संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याने २३ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३८ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळत बेन कटिंगने संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. शेन वॉटसनच्या अखेरच्या षटकात कटिंगने तीन षटकार आणि एका चौकारासह २४ धावांची लूट केली. कटिंगने फक्त १५ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ३९ धावांची खेळी साकारली.
हैदराबादच्या २०९ धावांचा पाठलाग करताना ख्रिस गेलने झंझावाती फलंदाजी करायला सुरुवात केली. गेल एवढा प्रखरपणे प्रहार करत होता की, दुसऱ्या टोकाकडे असलेल्या विराट कोहलीला करण्यासारखे काहीच नव्हते. सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गेलने लाँग ऑनला षटकार लगावत २५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर नवव्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकारांसह बंगळुरूने २१ धावा लुटल्या आणि संघाचे शतक झळकले. ११व्या षटकात जिथे कोहलीला दुसऱ्या चेंडूवर जीवदान मिळाले, त्यानंतरच्याच षटकात गेल मोठा फटका खेळण्याचा नादात बाद झाला, त्याने ३८ चेंडूंत चार चौकार आणि आठ चौकारांच्या जोरावर ७६ धावांची वादळी खेळी साकारली. गेल बाद झाल्यावर कोहलीने १३व्या षटकात षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले, पण याच षटकात तोही बाद झाला आणि मोसमात हजार धावा करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. कोहलीने पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. कोहलीनंतर एबी डी’व्हिलियर्सही (५) झटपट बाद झाला व त्यानंतर बंगळुरूच्या हातून सामना निसटला.

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद २०८ (डेव्हिड वॉर्नर ६९, बेन कटिंग नाबाद ३९, युवराज सिंग ३८; एस. अरविंद २/३०, ख्रिस जॉर्डन ३/४५) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ७ बाद २०० (ख्रिस गेल ७६, विराट कोहली ५४; बेन कटिंग २/३५)
सामनावीर : बेन कटिंग.

ऑरेंज कॅप – विराट कोहली
सामने-१६, धावा-९७३, सर्वाधिक-११३, सरासरी-८१.०८, शतके- ४, अर्धशतके- ७, चौकार-८३, षटकार-३८
पर्पल कॅप – भुवनेश्वर कुमार<br />सामने-१७, विकेट्स-२३, निर्धाव षटके-३, सर्वोत्तम-४/२९, इकॉनॉमी-७.४२, डावात चार बळी- १,
सर्वाधिक झेल- एबी डी’व्हिलियर्स (१९)

आमच्यासाठी अद्भुत असा हंगाम आहे. डेव्हिडने स्वत:च्या खेळाने संघासमोर उत्कृष्ट उदाहरण सादर केले. हा प्रवास अफलातून असा होता. संघाचे संतुलन महत्त्वाचे होते. जशजशी स्पर्धा पुढे गेली त्यानुसार आम्ही मोठी धावसंख्या नोंदवू शकलो. बेन कटिंगने दोन किंवा तीन सामनेच खेळले पण प्रत्येकवेळी चांगले प्रदर्शन केले.
-शिखर धवन

अंतिम सामन्यात खेळण्याचे दडपण न घेता खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजांचा झंझावात रोखण्यासाठी यॉर्कर हे प्रभावी अस्त्र आहे. डेव्हिडने मला शांत राहून यॉर्कर टाकायला सांगितले. मी तेच केले.
-भुवनेश्वर कुमार

अंतिम सामन्यात संघाच्या जिंकण्यात आणि पर्यायाने जेतेपदात योगदान देता आले याचे समाधान आहे. जेतेपद पटकावल्याची भावना सुखद आणि स्वप्नवत आहे. मला आज खेळायची संधी मिळाली आणि मी त्याचे सोने केले.
-बेन कटिंग

संपूर्ण संघाचे दिमाखदार प्रदर्शन. आम्ही चांगल्या पद्धतीने पुनरागमन केले. भुवनेश्वर आणि मुस्ताफिझूर यांनी शानदार गोलंदाजी केली. जेतेपद मिळाल्याने दुखापतीचा विसर पडला आहे.
-युवराज सिंग