गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना या दिवसात आपल्या पुस्तकाबद्दल चर्चेत आहे. या पुस्तकात रैनाच्या क्रिकेट कारकीर्दीतील चढउतारांबद्दलही अनेक खुलासे झाले आहेत. सध्या चेन्नई सुपर किंग्जचा हा खेळाडू आपल्या आत्मचरित्राच्या प्रचारात व्यस्त आहे. दरम्यान, एका संभाषणात त्याने आपली प्रेमकथाही उघडकीस आणली. लग्नापूर्वी प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी ऑस्ट्रेलियापासून इंग्लंडपर्यंत कसा प्रवास केला होता आणि भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने हा प्रवास करण्यापूर्वी कोणता सल्ला दिला होता, हे रैनाने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असताना ७ ते ८ दिवस प्रत्येक खेळाडूला सुट्टी मिळाली होती. या सुट्टीचा फायदा घेत रैना प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी इंग्लंडला पोहोचला. या प्रवासासाठी धोनीने रैनाची समजूत घातली होती. ”तू ऑस्ट्रेलिया सोडून इंग्लंडला जात आहेस. बघ तुला दुसरी कोणीतरी मिळू शकते”, असे धोनीने रैनाला सांगितले होते. मात्र रैनाने धोनीचे न ऐकता इंग्लंड गाठले.

हेही वाचा – VIDEO : कोका-कोला घटनेवरून टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने रोनाल्डोची घेतली फिरकी!

रैना म्हणाला, ”माझ्याकडे यूकेचा व्हिसा होता. मी बीसीसीआयची परवानगी घेतली. आम्ही पर्थमध्ये होतो. प्रपोजच्या प्रस्तावासाठी प्रथम पर्थ ते दुबई येथे १६ तास प्रवास केला आणि नंतर दुबई ते इंग्लंड पर्यंत १० ते १२ तास प्रवास केला. क्रिकेट खेळणे सोपे आहे, परंतु मुलीला प्रपोज करणे कठीण आहे. प्रपोज करण्यासाठी कोणतीही दुसरी योजना नसते. आपल्याकडे फक्त एक योजना होती आणि मी त्यावर लक्ष केंद्रित केले.” २०१५मध्ये सुरेश रैनाने प्रियांकासोबत लग्न केले. या दोघांना ग्रासिया आणि रिओ अशी दोन मुले आहेत.