ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर सध्या भारतीय संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. त्यातचं विराट कोहली भारतात परतणार असल्यामुळे उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. पृथ्वी शॉचं अपयश, मोहम्मद शमीला झालेली दुखापत यामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय संघासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम ११ चा संघ निवडताना मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या सर्व बाजूंनी होत असलेल्या टीकेमुळे संघाचं मानसिक धैर्य कमी होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवा !

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टीम इंडियाला एक मोलाचा सल्ला दिला आहे. आपले फोन स्विच-ऑफ करा, बाहेर होणाऱ्या चर्चेपासून स्वतःला दूर ठेवा. संघ म्हणून एकत्र या आणि पुढचा विचार करा, अशा आशयाचं ट्विट करत कैफने भारतीय संघाला धीर दिला आहे.

यावेळी बोलत असताना कैफने अजिंक्य रहाणेकडे आता सर्व संघाला एकत्र करुन स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्याची मोठी जबाबदारी असल्याचंही म्हटलंय. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत कांगारु सध्या १-० ने आघाडीवर आहेत. या मालिकेतला दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवण्यात येणार आहे.