ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत सामन्यावर मजबूत पकड बसवलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दाणादाण उडाली. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. या निमित्ताने टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये आपली निच्चांकी धावसंख्याही नोंदवली. पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. BCCI च्या निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी राहुल द्रविडला भारतीय संघाच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियात पाठवण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे.

अवश्य वाचा – He Literally Killed Him ! विराट कोहलीला रनआऊट करण्यावरुन शोएब अख्तरची रहाणेवर टीका

“बीसीसीआयने राहुल द्रविडला भारतीय खेळाडूंच्या मदतीसाठी लगेच ऑस्ट्रेलियाला पाठवलं पाहिजे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर जेव्हा चेंडू वळतो तेव्हा फलंदाजी कशी करावी याचं मार्गदर्शन द्रविडपेक्षा कोणीही चांगल्या पद्धतीने करु शकणार नाही. त्याचं ऑस्ट्रेलियात असणं भारतीय संघाला नेट्समध्ये सरावादरम्यान फायदेशीर ठरु शकतं. सध्या करोनामुळे NCA तसंही बंद आहे, त्यामुळे सध्या राहुलकडे विशेष काम असेल असं वाटत नाही.” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वेंगसरकर बोलत होते.

अवश्य वाचा – …म्हणून विराट कोहली अजिंक्य रहाणेपेक्षा अधिक यशस्वी ! संजय मांजरेकरांनी सांगितलं कारण

ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर त्याला नियमाप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागला तरीही तिसऱ्या कसोटी सामन्यापासून तो भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यासाठी हजर राहू शकतो. राहुल द्रविडने आता भारतीय संघासोबत असण्याची गरज असल्याचंही वेंगसरकर म्हणाले. या मालिकेतला दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – विराटच्या अनुपस्थितीत भारताला फलंदाजी बळकट करायला पंतची गरज – रिकी पाँटींग