scorecardresearch

सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला जेतेपद; अंतिम सामन्यात मालविकावर मात; इशान-तनिशाला मिश्र दुहेरीचे जेतेपद

करोनाच्या साथीमुळे ओस पडलेल्या मैदानात खेळताना अव्वल मानांकित सिंधूला विजेतेपदाच्या लढतीत मालविकाविरुद्ध २१-१३, २१-१६ असा संघर्ष करावा लागला.

अंतिम सामन्यात मालविकावर मात; इशान-तनिशाला मिश्र दुहेरीचे जेतेपद

दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने युवा मालविका बनसोडला सरळ गेममध्ये नमवून रविवारी कारकीर्दीत दुसऱ्यांदा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धा जिंकली. मिश्र दुहेरीत भारताच्या सातव्या मानांकित इशान भटनागर आणि तनिशा क्रॅस्ट्रो जोडीने जेतेपद पटकावले. पुरुष आणि महिला दुहेरीत मात्र भारतीय जोडय़ांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

करोनाच्या साथीमुळे ओस पडलेल्या मैदानात खेळताना अव्वल मानांकित सिंधूला विजेतेपदाच्या लढतीत मालविकाविरुद्ध २१-१३, २१-१६ असा संघर्ष करावा लागला. हा सामना ३५ मिनिटे चालला. माजी विश्वविजेत्या सिंधूने याआधी २०१७मध्ये या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते.

सिंधू जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे, तर मालविका क्रमवारीत ८४व्या क्रमांकावर असल्याने हा सामना एकतर्फी होईल, ही अपेक्षा फोल ठरली. सिंधूने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि कौशल्याच्या बळावर मालविकाविरुद्ध सरशी साधली.

टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सिंधूने पहिल्या गेममध्ये वर्चस्वपूर्ण सुरुवात करीत ७-० अशी आघाडी मिळवली. मग उंचीचा अचूक फायदा उचलत ११-१पर्यंत आघाडी उंचावली. विश्रांतीनंतर मालविकाने आक्रमक खेळ करीत काही गुण मिळवले आणि अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु सिंधूने ८ गुणांच्या फरकाने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये मालविकाने अप्रितम खेळाचे प्रदर्शन करीत सामना वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न केला. विश्रांतीला सिंधूने ११-४ अशी आघाडी मिळवत तिला वरचढ होऊ दिले नाही. पण नंतर मालविकाने खेळ उंचावत गुणांचे अंतर १२-१७ असे कमी केले. मालविकाने उत्तरार्धातही चांगली लढत दिली. पण अखेर सिंधूने बाजी मारली.

पुरुष एकेरीचा अंतिम सामना रद्द

अर्नाऊड मेर्केले आणि ल्युकास क्लेअरबाऊट यांच्यातील पुरुष एकेरीचा अंतिम सामना करोनामुळे रद्द करण्यात आला. फ्रान्सच्या या दोन स्पर्धकांपैकी एकाला करोनाची लागण झाली, तर दुसरा स्पर्धक बाधिताच्या संपर्कात होता. त्यामुळे हा सामना होणार नसल्याचे सकाळीच स्पष्ट करण्यात आले. विजेता, जागतिक क्रमवारीतील गुण आणि पारितोषिक रक्कम याबाबत जागतिक बॅडिमटन महासंघ लवकरच घोषणा करणार आहे.

’  मिश्र दुहेरीत इशान-तनिशा जोडीने टी. हेमा नागेंद्र बाबू आणि श्रीवेद्या गुराझादा जोडीला २९ मिनिटांत २१-१६, २१-१२ असे सहज नमवले.

’  पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित कृष्णा प्रसाद गार्गा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला जोडीने मलेशियाच्या मान वेई चाँग आणि काय वुन टी जोडीकडून १८-२१, १५-२१ अशी हार पत्करली.

’  महिला दुहेरीत सातव्या मानांकित ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने मलेशियाच्या अ‍ॅना चिंग यिक चीआँग आणि तीऊ मेई शिंग जोडीकडून १२-२१, १३-२१ असा पराभव पत्करला.

Syed Modi Badminton Tournament India won the title Olympic winners akp 94

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Syed modi badminton tournament india won the title olympic winners akp

ताज्या बातम्या