T20 WC: ऑस्ट्रेलियाविरोधात मोक्याच्या क्षणी कॅच सोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलला हसन अली, म्हणाला, “मला माहितीय…”

सेमी फायनलमध्ये मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडणाऱ्या हसन अलीला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं

T20 World Cup, Pakistan Cricketer Hasan Ali, Pakistan Australia Semi Final, Pak vs Aus, हसन अली
सेमी फायनलमध्ये मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडणाऱ्या हसन अलीला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं

ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये केलेल्या पराभवामुळे पाकिस्तान संघाचं टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाने एकही सामना न हारता उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तान संघाची विजयी घोडदौड रोखली आणि अंतिम फेरी गाठली. मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवानंतर मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडणाऱ्या हसन अलीला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

PAK VS AUS: “…तर कदाचित आम्ही सामना जिंकलो असतो”, बाबर आझमने सांगितलं पराभवाचं कारण

पाकिस्तानी चाहत्यांनी हसन अलीला ट्रोल करत त्याच्या कुटुंबीयांवरही निशाणा साधला होता. या सर्व घडामोडींवर हसन अलीने मात्र मौन बाळगलं होतं. पण आता पहिल्यांदाच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हसन अलीने ट्वीट करत म्हटलं आहे की, “मला माहिती आहे की, तुमच्या अपेक्षेप्रमाणे खेळलो नाही यामुळे तुम्ही सर्व नाराज आहेत. पण माझ्यापेक्षा जास्त नक्की नसाल. माझ्याकडून असणाऱ्या तुमच्या अपेक्षा अशाच कायम ठेवा. मी पाकिस्तान क्रिकेटची शक्य तितकी सेवा करु इच्छितो, त्यामुळे पुन्हा एकदा मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. हा टप्पा मला अजून मजबूत करण्यास मदत करेल. तुमच्या मेसेज, ट्वीट्स, पोस्ट्स, फोन आणि प्रार्थनांसाठी आभारी आहे, मला त्याची गरज होती”.

नेमकं काय झालं होतं –

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने एक ओव्हर राखून हा सामना जिंकला. मॅथ्यू वेडने १९व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर शाहीन आफ्रिदीविरुद्ध सलग तीन षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान १९ व्या ओव्हरमध्ये तुफान फलंदाजी करत असलेल्या मॅथ्यू वेडचा कॅच सोडण्यात आला आणि तिथेच पाकिस्तानच्या हातून विजयदेखील निसटला. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनेदेखील तो सुटलेला झेल सामन्यातील टर्निग पॉईंट होता असं म्हटलं आहे.

१७७ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये २२ धावांची गरज होती. यावेळी मॅथ्यू वेडने लगावलेल्या एका फटक्यावर हसन अलीने कॅच सोडला आणि पुढील तीन चेंडूंवर वेडने शाहीन आफ्रिदीला सलग तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

बाबर आझमने काय म्हटलं –

पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर बोलताना बाबर आझमने म्हटलं की, “सामन्याच्या पहिल्या पूर्वाधात आम्ही ज्याप्रकारे सुरुवात केली त्यामुळे आम्हाला चांगली धावसंख्या उभारता आली. पण आम्ही शेवटी त्यांना खूप संधी दिली”. दरम्यान पाकिस्तान संघाने ज्या पद्धतीने उपांत्य फेरी गाठली त्याचा आपल्याला अभिमान असल्याचंही बाबरने म्हटलं.

“जर आम्ही तो कॅच घेतला असता तर कदाचित फरक पडला असता. पण आम्ही ज्याप्रकारे स्पर्धेत खेळलो त्यावरुन कर्णधार म्हणून समाधानी आहे,” असंही बाबरने सांगितलं. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, “आम्ही आमच्या चुकांमधून शिकू अशी आशा आहे. जर आम्ही स्पर्धेत इतकं चांगलं खेळू शकलो आहोत तर नक्कीच यामुळे आत्मविश्वास वाढला असून यापुढेही अशाच पद्धतीने खेळत राहू”.

रंगतदार सामना

पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ अशी धावसंख्या उभारली होती. मोहम्मद रिझवान (६७) आणि कर्णधार बाबर आझम (३९) या भरवशाच्या सलामीवीरांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी ७१ धावांची सलामी दिल्यावर आझमला अ‍ॅडम झॅम्पाने बाद केले. रिझवानने मात्र उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवताना या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याला डावखुऱ्या फखर झमानची (नाबाद ५५) तोलामोलाची साथ लाभली.

पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत गाठले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. डेव्हिड वॉर्नर (४९) आणि मिचेल मार्श (२८) यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले. मात्र, लेगस्पिनर शादाब खानने या दोघांसह स्टिव्ह स्मिथ (५) आणि ग्लेन मॅक्सवेल (७) या चौकडीला बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पण स्टॉइनिस आणि वेड यांनी ८१ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup pakistan cricketer hasan ali tweet after being trolled for dropping catch against australia in semi final sgy

Next Story
पं. मनोहर चिमोटे
ताज्या बातम्या