२००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला टी-२० विश्वचषक सर्व क्रिकेट प्रेमींच्या लक्षात असेल. अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध जोगिंदर शर्माचं अखेरचं षटक, मिसबाह उल-हकने यष्टींमागे फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि हवेत उडालेला चेंडू थेट श्रीशांतच्या हातात जावून विसावला…आणि जगभरात सर्व भारतीयांनी त्यादिवशी एकच जल्लोष केला. त्या अखेरच्या षटकाने जोगिंदर शर्माला हिरो बनवलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिसांत पोलिस उप-अधिक्षक पदावर काम करतो आहे.

सध्या जगभरासह भारतात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. या कठीण काळातली जोगिंदर शर्मा हरियाणात आपलं कर्तव्य बजावतो आहे. नाकाबंदी आणि संचारबंदीच्या दरम्यान रस्त्यांवर फिरताना जोगिंदर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करतो आहे. त्याचा पोलिसी गणवेशातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर आयसीसीनेही त्यातं कौतुक केलं आहे.

करोनाविरुद्ध लढ्यात अनेक क्रीडापटू आपलं सामाजिक भान राखत, सरकारी यंत्रणांना मदत करत आहेत. आतापर्यंत बीसीसीआय, मुंबई-सौराष्ट्र-पश्चिम बंगाल-महाराष्ट्र क्रिकेट संघटना, मोहन बागान फुटबॉल क्लब यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायनिधीला मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात सध्या पोलिस यंत्रणांवर बराच ताण आहे…विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे जोगिंदर शर्मा करत असलेल्या कामाचं कौतुक हे व्हायलाच हवं.