करोनातून सावरलेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने शनिवारी चाहत्यांना रक्तद्रव (प्लाझ्मा) दान करण्याचे आवाहन केले. मी पात्र ठरल्यावर स्वत:ही करणार आहे, असे सचिनने सांगितले.

२७ मार्चला करोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर सचिनला सावधगिरीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ एप्रिलला घरी परतल्यानंतर तो घरीच विलगीकरणात आहे. सचिनने शनिवारी आपल्या ४८व्या वाढदिवसानिमित्त ‘ट्विटर’वर पोस्ट केलेल्या चित्रफितीत म्हटले की, ‘‘गतवर्षी मी एका रक्तद्रव दान केंद्राचे अनावरण केले. रक्तद्रव योग्य वेळी दिला गेला, तर रुग्ण लवकर बरा होईल,  असा संदेश या केंद्राने दिला होता. हाच संदेश मी तुम्हाला देतो आहे.’’