दोन जुळ्या मुलींपाठोपाठ दोन जुळ्या मुलांचा वडील झालेला रॉजर फेडरर प्रतिष्ठेच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळणार आहे. गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी फेडररने माद्रिद टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. या घोषणेनंतर काही तासांतच फेडरर दांपत्याला जुळ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याने फेडररचा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फेडररचा व्यवस्थापक टोनी गॉडसिकने यासंदर्भात अधिक माहिती दिली.
२५ मेपासून फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सुरू होत आहे. ३२वर्षीय फेडररने सलग विक्रमी ५७ ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये खेळण्याचा विक्रमी नावावर केला आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळण्याची यंदा त्याची सलग सोळावी वेळ असणार आहे. २००९ मध्ये त्याने या स्पर्धेचे शेवटचे जेतेपद पटकावले होते.