आइसलँडने नेदरलँड्स संघावर १-० अशी मात केल्यामुळे युरो चषक फुटबॉल स्पर्धेत नेदरलँड्सचा बाद फेरीतील प्रवेश अडचणीत आला आहे.
उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत गिल्फी सिगुर्डसनने ५१ व्या मिनिटाला आइसलँडचा विजयी गोल केला. या सामन्यातील विजयामुळे त्यांनी अकरा गुणांसह साखळी गटातील आघाडीस्थान कायम राखले आहे. नेदरलँड्सपेक्षा ते आठ गुणांनी आघाडीवर आहेत. या स्पर्धेतील अद्याप तीन सामने बाकी आहेत.
विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर नेदरलँड्सची कामगिरी फारशी झालेली नाही. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षक गस हिदीक यांना आपले पद गमवावे लागले होते. त्यांच्या पदी आलेल्या डॅनी ब्लाइंड यांच्यावरही टीका होत आहे.
नेदरलँड्चा कर्णधार अर्जेन रॉबेनला या सामन्यात दुखापतीमुळे शेवटची पंधरा मिनिटे मैदानाबाहेर जावे लागले. त्यांचा ब्रुनो मार्टिन्स याला ३३ व्या मिनिटांनंतर बेशिस्त वर्तनाबद्दल मैदानाबाहेर जावे लागले.
स्पर्धेतील अन्य लढतीत चेक प्रजासत्ताक संघाने कझाकिस्तान संघावर २-१ अशी मात केली. त्याचे श्रेय मिलान स्कोडा याने केलेल्या दोन गोलांना द्यावे लागेल.
साखळी ‘ब’ गटात गॅरेथ बेलने केलेल्या गोलामुळेच वेल्स संघाला सायप्रसविरुद्ध १-० असा विजय मिळविता आला. या विजयामुळे वेल्स संघाने बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यांचे आता १७ गुण झाले आहेत. यापूर्वी १९५८ च्या विश्वचषक स्पर्धेत वेल्स संघाने बाद फेरीत स्थान मिळविले होते. बेल्जियमने बोस्नियावर ३-१ अशी मात करीत आव्हान राखले. इस्रायलने अँडोरा संघाचा ४-० असा दणदणीत पराभव केला. साखळी ‘एच’ गटांत इटली संघाने माल्टा संघावर १-० अशी मात केली. त्यांचा हा एकमेव गोल ग्रॅझियानो पेले याने ६९ व्या मिनिटाला केला. क्रोएशिया व अझरबैजान यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.