जोपर्यंत महाराष्ट्र कॅरम संघटनेचा नकारात्मक दृष्टिकोन आणि पूर्वग्रहदूषित असहकारवृत्ती बदलत नाही, तोपर्यंत यापुढे आम्ही महाराष्ट्रात राष्ट्रीय कॅरम स्पर्धा घेणार नाही, असा इशारा  अखिल भारतीय कॅरम महासंघाने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला दिला आहे. पुण्यातील ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य कॅरम स्पर्धेचे यजमानपद पुणे किंवा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन भूषवू शकत नाही, तर नवीन आराखडय़ानुसार भारतीय कॅरम महासंघ या स्पर्धेचे यजमानपद भूषवेल, असे महासंघाने जाहीर केले होते. परंतु त्यासंदर्भातील कोणतेही पत्र त्यांनी संलग्न असोसिएशन्सला दिलेले नाही, तर नियमांनुसार हे नवीन आराखडय़ाचे पत्र मागवणाऱ्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला त्यांनी सज्जड इशारा दिला आहे.
‘तुमच्या अटींनुसार आम्ही स्पर्धा घेणार नाही’असा पत्रव्यवहार   २१ मार्चला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केला होता. तेव्हा या पत्राला उत्तर देताना महासंघाने कोणती अट तुम्हाला मान्य नाही, असे विचारण्याऐवजी २४ मार्चला नवे पत्र पाठवून ‘यापुढे महाराष्ट्रात राष्ट्रीय स्पर्धा घेणार नाही’ असेही म्हटले आहे.
याबाबत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार म्हणाले की, ‘‘भारतीय कॅरम महासंघाची उत्तर देण्याची भाषा चुकीची आहे. जर महासंघाने कोणता निर्णय घेतला असेल तर त्यांनी तो संलग्न असोसिएशनला उचित दाखल्यांसह स्पष्ट करायला हवा. आम्हाला कॅरमचा प्रसार करायचा आहे, पण तो कोणत्याही वाईट मार्गाने नाही. महासंघाच्या सचिवांनी आम्हाला स्पर्धा महाराष्ट्रात न भरवण्याचे कळवले आहे, पण हा निर्णय जर महासंघाचा असेल तर त्यांनी तो बैठकीत घ्यायला हवा, इथे तसे काहीच दिसत नाही. कारण स्पर्धा भरवता येणार नाही, असे म्हणताना महासंघाच्या सचिवांनी आम्हाला बैठकीचे इतिवृत्त पाठवलेले नाही, त्यामुळे हा निर्णय महासंघाचा की फक्त सचिवांचा हे समजलेले नाही.
याबाबत अखिल भारतीय कॅरम महासंघाचे सचिव प्रभजीतसिंग बच्चर म्हणाले की, ‘‘आम्ही यापूर्वी स्पर्धा घेतल्या तेव्हा नवीन आराखडय़ाचे स्पष्टीकरण आम्हाला कोणीही विचारले नाही. महाराष्ट्राच्या असोसिएशनलाच काय समस्या आहेत, हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे जर त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन आणि पूर्वग्रहदूषित असहकारवृत्ती कायम राहिली तर त्यांना आम्ही स्पर्धा देणार नाही, पण जर त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झाला तर आम्ही त्यांना स्पर्धेचे यजमानपद निश्चितपणे देऊ.’’
ही स्पर्धा नेमकी कशी भरवली जाईल, असे विचारल्यावर बच्चर म्हणाले की, ‘‘नवीन आराखडय़ानुसार महासंघ यजमान असेल आणि महाराष्ट्राची त्याला मान्यता असेल.’’ याबाबत राष्ट्रीय स्पर्धेला महासंघाची मान्यता हवी की महाराष्ट्राची असे विचारल्यावर त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते.