भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय खेळांडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टिपण्णीचा सामना करावा लागला. याप्रकरणी सर्वच स्तरातून टीका होत असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा तर असभ्य वर्तनाचा कळस असून वर्णद्वेषी टिपण्णी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत त्याने आपला राग व्यक्त केला.

विराटने ट्विट करुन याप्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानं म्हटलं की, “याघटनेकडे तातडीची बाब म्हणून आणि गांभीर्यतापूर्वक लक्ष घालायला पाहिजे. तसेच असं कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यायला हवी, ज्यामुळे यापुढे अशा घटना घडणार नाहीत”

“वर्णद्वेषी टिपण्णी ही कदापी सहन केली जाणार नाही. सीमारेषेवर अनेकदा अशा घटनांना सामोरं जावं लागलं असून हे खूपच लाजीरवाणी बाब आहे. असभ्य वर्तनाचा हा कळस आहे. खेळाच्या मैदानावरही असं काही पहायला मिळल्यास वाईट वाटतं,” असंही विराटनं म्हटलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिपण्णी केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी सिराजला पुन्हा एकदा अशा टिपण्णीचा सामना करावा लागला. यासंदर्भात भारतीय संघाने पंचांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काही काळ सामना थांबवण्यात आला आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सहा जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.