करोनामुळे ब्रिटनमधील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा रद्द करण्याची वेळ संयोजकांवर ओढवली आहे.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तसेच ७ जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा रद्द झाल्यामुळे आता ऑल इंग्लंड क्लबकडे नैसर्गिक हिरवळीवर होणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नव्हता. २८ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र संपूर्ण जग करोनासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करत असताना ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय अखेर संयोजकांनी घेतला आहे. बुधवारी याबाबतची घोषणा करण्यात आली.

‘‘करोनामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असताना ऑल इंग्लंड क्लबचे मुख्य मंडळ तसेच व्यवस्थापन समिती ही स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करत आहे. ब्रिटनमधील जनता, परदेशातून येणारे चाहते तसेच खेळाडू, पाहुणे, सदस्य, कर्मचारी, स्वयंसेवक, कंत्राटदार  यांच्या आयुष्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर समाजाचे हित जपण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही स्पर्धा रद्द करत आहोत. तिकीट विकत घेतलेल्यांचे सर्व पैसे परत केले जातील अथवा पुढील वर्षी त्याच दिवशीचे तिकीट त्यांना दिले जाईल. सर्व तिकिटधारकांशी आम्ही वैयक्तिकपणे संपर्क साधणार आहोत,’’ असे ऑल इंग्लंड क्लबच्या पत्रकात म्हटले आहे.

तीन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारा बोरिस बेकर याने अंतिम निर्णय घेण्याआधी संयोजकांनी बराच वेळ घ्यावा, अशी विनंती के ली होती. ‘‘एप्रिलच्या अखेरीस विम्बल्डनच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात यावा. संयम हाच त्यावर एकमात्र उपाय आहे,’’ असे बोरिस बेकरने म्हटले होते. तसेच २००६ साली विम्बल्डन जिंकणारी अव्वल महिला टेनिसपटू अ‍ॅमेली मॉरेस्मो हिने यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती.