लीगच्या माध्यमातून बहुतांशी खेळांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. मात्र अचानक आलेल्या या पैशाने गैरव्यवहार वाढीस लागले. प्रो कबड्डी लीग स्पर्धेत स्पॉट-फिक्सिंग, मॅच-फिक्सिंग किंवा तत्सम कोणतेही गैरप्रकार घडू नये, यासाठी संयोजकांतर्फे खेळाडू, प्रशिक्षक, सहयोगी, सामनाधिकारी यांचा एकत्रित वर्ग घेण्यात आला. क्रिकेटेतर खेळातील लीग लोकप्रियता आणि आर्थिक संरचना दोन्ही आघाडय़ांवर डळमळत असताना प्रो कबड्डी लीग प्रत्येक हंगामागणीक लोकप्रियता आणि नफ्याच्या निकषांवर नवे मापदंड प्रस्थापित करीत आहे. या स्पर्धेला गैरप्रकारांची वाळवी लागू नये, यासाठी चौथ्या हंगामापूर्वी लीगशी संबंधित सर्वाना हे अनिवार्य मूल्यशिक्षण देण्यात आले.
‘‘खेळाडूंना मोहात अडकवण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करण्यात येतो, पैशाचा विनियोग करताना कशी काळजी घ्यावी, स्पर्धेदरम्यान कोणाशी चर्चा करू नये, गैरप्रकारात दोषी आढळल्यास होणारी शिक्षा आणि परिणाम अशा विविधांगी गोष्टी तपशीलवार समजावून देण्यात आले,’’ अशी माहिती प्रो कबड्डी लीगचे स्पर्धेचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांनी सांगितले. स्पर्धेचे प्रवर्तक स्टार स्पोर्ट्सने यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘‘असंख्य कबड्डीपटू आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घरातले आहेत. इंग्रजी, हिंदी भाषेचेही त्यांना अडचण जाणवते. मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करणे आणि गैरप्रकारांपासून दूर राहणे, या दोन्हींविषयी समुपदेशन खेळाडूंसाठी उपयुक्त आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
- चढाई-पकडींच्या खेळातील साशंकता दूर व्हावी, यासाठी काय करता येईल यावर विचार सुरू आहे. मॅरेथॉन धावपटूंप्रमाणे चढाईपटूच्या शूजमध्ये चीप बसवता येऊ शकते का, याची चाचपणी सुरू आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूला स्पर्श केल्यानंतर प्रकाश परावर्तित होईल, अशा स्वरूपाच्या उपकरणासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन आहे. शारीरिक संपर्कता आणि एक विरुद्ध अनेक असा मुकाबला असल्याने याची अंमलबजावणी करणे अवघड आहे. मात्र तपशीलवार चाचणीनंतर हा प्रयोग मांडता येऊ शकेल.
- महिला कबड्डीचे सामने या हंगामात प्रायोगिक तत्त्वावर आयोजित करण्यात आले होते. मात्र चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन आगामी हंगामात नियमित स्वरूपात महिलांची लीग सुरू करण्याचा स्टारचा मानस आहे. मात्र कोर्टची लांबी रुंदी पुरुषांच्या सामन्यांच्या कोर्टएवढीच असेल. कारण कॅमेरा आणि मॅट यांची रचना बदलणे शक्य नसल्याने महिलांना पुरुष गटाच्या लढती ज्या कोर्टवर होतात त्यावरच खेळावे लागणार आहे.
- तूर्तास प्रत्येक फ्रँचाइजींना संघात किमान तीन विदेशी खेळाडू घेणे अनिवार्य आहे. मात्र अंतिम संघात विदेशी खेळाडूंना खेळवणे अनिवार्य नाही. कोरिया, इराणच्या खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनामुळे विदेशात कबड्डीला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. विदेशात कबड्डीला मिळालेला जनाधार जपण्यासाठी अंतिम संघात ठरावीक विदेशी खेळाडूंना अनिवार्य करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- क्रिकेट, टेनिस यांची लोकप्रियता वाढण्यात व्हिडीओ गेम्सचा मोठा वाटा आहे. त्याच धर्तीवर प्ले स्टेशन खेळांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यासंदर्भात एका कंपनीशी चर्चा झाली आहे. सर्व गोष्टी जुळल्यास टीव्हीवर दिसणारा हा खेळ दिवाणखान्यातील प्लेस्टेशनचा भाग असेल.
