रत्नागिरी कॅरम लीग

रत्नागिरी कॅरम लीगच्या चौथ्या हंगामात व्हिक्टोरियन्सने अंतिम फेरीत मातोश्री विनर्सचा २-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मातोश्री विनर्सच्या संदीप देवरुखकर व अनिल मुंढे जोडीने व्हिक्टोरियन्सच्या गिरीश तांबे व दस्तगीर शेख या जोडीचा २५-१६, २१-२ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. परंतु व्हिक्टोरियन्सच्या अभिजीत त्रिपनकरने एकेरीच्या पहिल्या सामन्यात मातोश्रीच्या अभिषेक चव्हाणला २५-०, २५-१०, २५-१२ असे हरवून बरोबरी साधली. मग दुसऱ्या एकेरीच्या निर्णायक लढतीत लढतीत व्हिक्टोरियन्सच्या महम्मद घुफ्रानने मातोश्रीच्या संदीप दिवेला ११-१९, २५-५, २५-२२ असे नमवून विजेतेपदावर नाव कोरले.

तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गॅलॅक्सी क्लस्टर्सने झियान सी फूड्स संघावर २-१ अशी मात केली. झियानच्या योगेश परदेशी व किरण धेंडने २५-६, २५-५ असे गॅलॅक्सीच्या संजय मांडे व इस्माईल मस्तान जोडीला हरवले होते. परंतु एकेरीच्या दोन्ही सामन्यांत गॅलॅक्सीच्या झैद अहमदने झियानच्या फहीम काझीला २५-१, २२-१८ तसेच राहुल सोळंकीने झाहूर कोतावडेकरला २५-०, २५-४ असे हरवले.

या स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून मातोश्रीच्या अभिषेक चव्हाणची निवड करण्यात आली. शिस्तबद्ध संघ म्हणून झियान संघाला गौरवण्यात आले, तर घुफ्रान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.