अक्षय वाखरेचे सहा बळी
महाराष्ट्राचा संघ फलंदाजीबाबत केवळ कागदावरच बलाढय़ आहे याचा प्रत्यय येथे रणजी क्रिकेट सामन्यात पाहावयास मिळाला. अक्षय वाखरे व आदित्य सरवटे या फिरकी गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडवित विदर्भ संघास ८२ धावांनी विजय मिळवून दिला.
फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर विजयासाठी २४५ धावांच्या आव्हानास सामोरे जाताना महाराष्ट्राने १ बाद ३ या धावसंख्येवर दुसरा डाव पुढे सुरू केला. हर्षद खडीवाले व अंकित बावणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. तसेच खडीवाले याने दमदार अर्धशतक टोलवूनही महाराष्ट्राचा डाव १६२ धावांत कोसळला. विदर्भ संघाने निर्णायक विजयासह सहा गुणांची कमाई केली.
खडीवाले व बावणे ही जोडी खेळत असताना महाराष्ट्राचे खेळाडू विजयासाठी प्रयत्न करीत आहेत असे वाटले होते. मात्र ही जोडी फुटल्यानंतर वाखरे व सरवटे या फिरकी जोडीने महाराष्ट्राच्या फलंदाजांची त्रेधातिरपीठ उडविली. खडीवाले याने नऊ चौकार व एका षटकारासह ५५ धावा केल्या. बावणे याने तीन चौकारांसह २३ धावा केल्या. भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या केदार जाधव (२८) याने सपशेल निराशा केली. कर्णधार रोहित मोटवानी याने शेवटच्या फळीत २८ धावा करीत संघाचा पराभव लांबविला. वाखरे याने २२ षटकांत ५८ धावा देत सहा गडी बाद केले. सरवटे याने १८.३ षटकांत ७४ धावांमध्ये चार गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
विदर्भ : ३३२ व १४९ वि.वि महाराष्ट्र २३७ व ४६.३ षटकांत सर्वबाद १६२ (हर्षद खडीवाले ५५, अंकित बावणे २३, केदार जाधव २८, रोहित मोटवानी २८, अक्षय वाखरे ६/५८, आदित्य सरवटे ४/७४)