भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेला युसूफ पठाण याने केलेले शतक व त्याची ज्योत भाग्येश छाया याच्या साथीत झालेली शतकी भागीदारी यामुळेच बडोद्यास सौराष्ट्राविरुद्धच्या विजय हजारे चषक क्रिकेट सामन्यात एक गडी व चार चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळविता आला. पूना क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पहावयास मिळाला. राहुल दवे (७ चौकार व ३ षटकारांसह ९६) व शेल्डॉन जॅक्सन (७ चौकार व २ षटकारांसह ६१) यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर सौराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद २९९ धावा करीत बडोद्यापुढे विजयासाठी तीनशे धावांचे आव्हान ठेवले. प्रतीक मेहता (५ चौकारांसह ४३) व चिराग जानी (२ चौकार व ३ षटकारांसह ४६) यांनीही सौराष्ट्राच्या धावसंख्येत मोठा वाटा उचलला.
विजयासाठी ३०० धावांचे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात बडोद्याची एक वेळ ४ बाद ४८ अशी दयनीय स्थिती होती. तथापि पठाणने झंझावती शतक करीत ज्योतच्या साथीत केवळ १५ षटकांमध्ये १३५ धावांची भागीदारी केली. पठाण (११६) व ज्योत (८२) यांनी चौफेर टोलेबाजी करीत मैदान दणाणून सोडले. पठाणने १०२ चेंडूंत ११६ धावा करताना नऊ चौकार व चार षटकार अशी फटकेबाजी केली. ज्योत याने ५५ चेंडूंमध्ये सात चौकार व पाच षटकार अशी टोलेबाजी केली. भार्गव भट्ट याने १३ चेंडूंत एक चौकार व एका षटकारासह २१ धावा करीत बडोद्यास ५० व्या षटकांत विजय मिळवून दिला.
संक्षिप्त निकाल :
सौराष्ट्र- ५० षटकांत ७ बाद २९९ (शेल्डॉन जॅक्सन ६१, राहुल दवे ९६, प्रतिक मेहता ४३, चिराग जानी ४६, लुकमन मेरीवाला २/५५, सुनीतसिंग २/५१) पराभूत वि. बडोदा- ४९.२ षटकांत ९ बाद ३०४ (विशु सोळंकी २८, युसूफ पठाण ११६, ज्योत छाया ८२, भार्गव भट्ट नाबाद २१, सूर्य सनोदिया ४/६७, जयदेव उनाडकत ३/५९).