न्यूझीलंड ज्या पद्धतीनं खेळतंय ते बघता ते विजयाचे मानकरी आहेत, असं मी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना म्हटलं होतं. कारण तेव्हा वाटलं होतं सामना हातून गेलाय. अशा शब्दांत व्यक्त होत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं आपल्या मनातली भीती व्यक्त करून दाखवली. पण, सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना रोहितच्या दोन सिक्सरच्या जोरावर भारतानं जिंकला आणि टीम इंडियासह चाहत्यांनीही जल्लोष केला.

सामना जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, शमीने दोन चेंडू निर्धाव टाकले आणि वाटलं आता आपण सुपरओव्हरमध्ये हा सामना नेऊ शकतो. न्यूझीलंडला जिंकण्यासाठी एका चेंडूत एक धाव हवी होती, तेव्हा त्रिफळा उडवला तरच कुठे काही शक्य होईल. झालंही तसंच. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपरओव्हरबद्दल विराट म्हणाला की, डेथ ओव्हरचा बादशाह असलेल्या बुमराहच्या गोलंदाजीवर केन विल्यमसनने जोरदार फटकेबाजी केली. पण त्यानंतर रोहितने कमाल केली.

सुपर ओव्हरमध्ये काय झाले?
सुपर ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १८ धावा हव्या होत्या. के. एल. राहूलनं मारलेल्या एका चौकाराखेरीज एकही मोठा फटका दोघांनाही चार चेंडूंमध्ये खेळता आला नव्हता. त्यामुळे चार धावांमध्ये अवघ्या आठ धावा झाल्या व शेवटच्या दोन चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी १० धावांची गरज होती. गोलंदाज सौदी टिच्चून गोलंदाजी करत होता. मात्र रोहितला अपेक्षित असलेली चूक सौदीनं केली आणि त्यानं पाचवा चेंडू ओव्हर पिच टाकला, ज्यावर रोहितनं लाँग ऑनला उत्तुंग षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी भारताला चार धावा हव्या असताना पुन्हा सौदीनं ओव्हरपिच पण यावेळी ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला जो रोहितनं लाँग ऑफच्या बाहेर भिरकावत सहा धावा वसूल केल्या व भारतानं सामन्यासह मालिका जिंकली.