इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला. संघाचा कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर असंख्य चाहत्यांनी उपस्थिती लावली. सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. धोनीने ५ जानेवारी रोजी भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे इंग्लडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी पुण्यात भारत विरुद्ध इंग्लंड हा पहिला एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेसाठी मंगळवारी इंग्लंडविरुद्ध भारताच्या ‘अ’ संघाचा सराव सामना खेळविण्यात येत आहे. धोनीना सन्मानित करण्यात आल्याचे ट्विट बीसीसीआयने केले आहे.

वाचा: धोनीसारखे यश मोजक्याच कर्णधारांना- युवराज सिंग

आयसीसीच्या तिनही मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिलाच कर्णधार आहे. आपल्या कर्णधारी कारकिर्दीच्या पदार्पणातच धोनीने भारतीय संघासाठी पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला. धोनीच्या नेतृत्त्वात संघाने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केले. धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. कर्णधारी गुणांसोबतच धोनी यष्टीरक्षणाच्याबाबती देखील तितकाच चपळ आणि कौशल्यपूर्ण आहे. धोनीच्या नावावर कसोटी विश्वात ३८ स्टम्पिंग, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९२, तर ट्वेन्टी-२० मध्ये २२ स्टम्पिंग जमा आहेत. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला. वानखेडे स्टेडियमवर २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करून भारतीय संघाने विश्वचषक उंचावला होता. धोनीने आतापर्यंत ९११० धावा ठोकल्या असून १८३ ही त्याची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.

वाचा: कर्णधारपदावरून पायउतार होण्यासाठी धोनीवर दबाव!