क्रिकेटमधून अवघ्या जगावर आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या मराठमोळ्या सचिन तेंडुलकरने सोमवारी पुणे विद्यापीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘मिशन यंग आणि फिट इंडिया’ या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकरला बोलतं केलं. शालेय आयुष्यापासून विद्यार्थ्यांसाठी खेळाचं महत्व, शाररिक व मानसिक स्वास्थ्य आणि ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी यांसारख्या अनेक विषयांवर सचिनने आपली मतं व्यक्त केली.

ऑलिम्पिक सारखी एखादी स्पर्धा आली की प्रत्येक जणाला भारताने पदक मिळवालं अशी आशा असते. यात गैर काहीही नसलं तरीही खेळाडूंसाठी पुरक व्यवस्थाच आपल्या देशात उपलब्ध नसल्याची खंत सचिन तेंडुलकरने बोलून दाखवली. पदक हे एका रात्रीत मिळत नाही असं म्हणत सचिनने व्यवस्थेमधील दोषांकडे लक्ष वेधलं. हिंदी चित्रपटांमधून एखाद्या खेळाडूबद्दल माहिती देण्याऐवजी, त्या खेळाडूचा धडा शालेय अभ्यासक्रमात देण्यात आला पाहिजे. खेळ हा विषय अभ्यासक्रमात आल्यास भारतात क्रीडा संस्कृती बहरायला वेळ लागणार नाही असं मत सचिनने व्यक्त केलं.

प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक बॅडपॅच येत असतो. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमची विचारप्रक्रिया आणि मनस्थिती बदलणं अत्यंत गरजेचं आहे. असं झाल्यास त्याचे परिणाम मैदानात दिसतील. आपल्यातल्या उर्जेचा कुठे वापर केला जावा हा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला खेळांमध्ये आवड असेलच असं नाही, पण आपलं शाररिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रत्येकाने खेळणं गरजेचं असल्याचं सचिनने यावेळी आवर्जून बोलून दाखवलं. काही शाळांमध्ये आज मैदानं आहेत तर काही शाळांमध्ये मैदानचं उपलब्ध नाहीत. मात्र ज्या शाळांमध्ये मैदानं आहेत तिकडेही त्या मैदानांचा पुरेपूर वापर केला जात नाही. खेळांप्रती अनास्था दाखवली की मोकळ्या मैदानात खेळांऐवजी इतर गोष्टी होताना दिसतात, असं परखड मत सचिनने व्यक्त केलं.