News Flash

प्रकाशाची वाट

पृथ्वी ज्या वेगाने स्वत:भोवती फिरते त्याहीपेक्षा जास्त वेगाने आज माणसं पळताना दिसतात.

मुलांना त्यांच्या आतमध्ये दडलेली प्रकाशाची वाट शोधायला मदत करायला हवी.

मुलं जेव्हा स्वत:हून घरातील काही कामे करू पाहतात ना तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्या संकल्पनेनुसार त्यांना ते करू दिलं म्हणजे मनाला उभारी येते आणि आज काहीतरी केलं, या विचाराने त्यांच्या मनाचं आरोग्य सुधारतं.. मुलांना त्यांच्या आतमध्ये दडलेली प्रकाशाची वाट शोधायला मदत करायला हवी.

भविष्यकाळासाठी आपण नेहमीच चार पैसे बाजूला राखून ठेवत असतो. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी पैशांची बचत करत असतो. आपली आर्थिक स्थिती भविष्यातही चांगली राहावी, आपल्या पैशांचं आरोग्य बळकट असावं यासाठी जर आपण जिवाचा आटापिटा करतो, तर मग मानसिक आरोग्याच्या बळकटीचा का नाही विचार करीत? ज्याप्रमाणे भविष्यातील उत्तम आर्थिक स्थितीसाठी आपण तरतूद करतो, त्याचप्रमाणे आपलं भावनिक आरोग्य सशक्त, निरोगी आणि सुदृढ राहावं यासाठी आपण का नाही तरतूद करत? भावनिक आरोग्याची बळकटीसुद्धा तितकीच महत्त्वाची असून ती आज एकविसाव्या शतकाची गरज बनली आहे. मित्रांनो! आजच्या लेखात आपण याच विषयावर बोलणार आहोत.

पृथ्वी ज्या वेगाने स्वत:भोवती फिरते त्याहीपेक्षा जास्त वेगाने आज माणसं पळताना दिसतात. या धावपळीत मानसिक ऊर्जा मात्र वेगाने कमी-कमी होत चालली आहे. काही वेळेस ती ऊर्जा अनावश्यक ठिकाणी वाया जाते किंवा मग चुकीच्या मार्गाने वापरली जाते. स्वभावात किंवा वागण्यात येणारी आक्रमकता पहिली की ऊर्जेचा गैरवापर आपण करू लागलोय हे जाणवतं. आता हेच बघा की, घरात आक्रमकपणे वागणारी मुलं आजकाल भर रस्त्यात, महाविद्यालयात एवढंच नाही तर शाळेतसुद्धा प्रचंड आक्रमक होताना दिसतात. मला सांगा की यात ऊर्जा खर्ची पडत नाही का! तब्येत चांगली राहण्यासाठी शरीराचं आरोग्यशास्त्र जपायचं असतं हे सगळ्यांना माहीत असतं, पण तब्येत चांगली ठेवायची असेल तर शारीरिक आरोग्याबरोबरच भावनिक आरोग्य जपणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. शारीरिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य या दोन्ही गोष्टी सारख्याच जपल्या तर सुदृढ आरोग्य लाभतं हे लोकांना माहिती नसतं. या दोन्हीपैकी एकाकडे जरी दुर्लक्ष झालं तरी आपल्या प्रकृतीचा समतोल ढासळतो आणि त्याचा एकूणच आरोग्यावर परिणाम होतो. चांगलं आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण म्हणतो ना; मग ती संपत्ती तेव्हाच मिळते जेव्हा शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक-भावनिक आरोग्यही जपलं जातं.

राकेशनं अभ्यास करावा म्हणून त्याची आई रोज त्याच्या मागे लागायची. अभ्यासात तो मागे पडत चालला होता आणि परीक्षेत त्याला खूपच कमी गुण मिळाले होते. आई रोज अभ्यासाचा तगादा लावायची. अशीच एक दिवस ती त्याला अभ्यासावरून बोलता बोलता त्याच्या जवळ गेली. तोच राकेशने तिला जोरात दूर लोटलं आणि ती पडली. दुर्दैवाने ती जोरात पडल्यामुळे दोन-तीन हाडांना चीर गेली आणि थेट रुग्णालय गाठावं लागलं. राकेशला भेटलो तेव्हा तो मला आक्रमक न वाटता खूप थकलेला, वैतागलेला आणि काहीसा दु:खी वाटला. तो त्याच्या मित्रांनासुद्धा कंटाळला होता. एका हुशार मुलाचं असं का व्हावं याचा मी विचार करीत होतो. त्याचा दिनक्रम ऐकल्यावर मलाच चक्कर आली. मुळात त्याचा दिनक्रम इतका जास्त गुंतागुंतीचा होता की हा मुलगा आराम तरी कधी करतो असा प्रश्न पडला. तो ऐन गर्दीच्या वेळी सायकलने महाविद्यालयात जायचा तेव्हा वाटेत रिक्षावाले, बसवाले, पादचारी आणि इतर वाहनचालकांशी त्याचे खटके उडायचे. कारण उशीर होऊ नये म्हणून तो भर ट्राफिकमध्ये वेगाने सायकल चालवायचा आणि इतरांना अडथळा झाला की बोलणी खावी लागायची, जे त्याला अजिबात आवडायचं नाही. महाविद्यालयात पोहोचला की एकामागून एक तासिका सुरू व्हायच्या. त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या खेळात, उपक्रमात भाग घ्यायला त्याला वेळ नसायचा. महाविद्यालयाची वेळ संपली की तिथून थेट शिकवणी वर्गाला जायचं. मग अजून दुसऱ्या शिकवणीला. मधे थोडी विश्रांती घ्यायला त्याला उसंतच मिळत नव्हती. एक संपलं की दुसरं आणि दुसरं संपलं की तिसरं! यामुळे ना त्याची अभ्यासात प्रगती झाली, ना त्याच्या मनाला उसंत मिळाली. लक्षात घ्या मित्रांनो, त्याच्या शरीरापेक्षा त्याचं मन जास्त थकत होतं. कारण त्याला विरंगुळ्याचे, विश्रांतीचे क्षण मिळत नव्हते. त्यामुळे त्याची चिडचिड व्हायची आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम त्याच्या शरीरावरसुद्धा होत होताच. त्याचा दिवस अनेक गोष्टींनी भरलेला होता. त्यातील काही गोष्टी निर्थक होत्या हे आधी त्याला पटवून दिलं. एक शिकवणी बंद करायला सांगितली. दिवसातील एक तास स्वत:साठी राखून ठेव आणि त्या वेळेत जरा डोक्याला आणि मनाला शांती दे, असं सुचवलं. तो जेव्हा मोकळ्या मैदानावर विरंगुळा म्हणून सायकल चालवू लागला तेव्हा ती सायकल चालविण्यात त्याला आनंद वाटू लागला आणि दिवसातील अध्र्या तासाचा वेळ तो प्राणायामसाठी देऊ लागला तेव्हा त्याला आपोआप फरक जाणवला. त्याची चिडचिड कमी झाली. स्वभाव शांत होऊ लागला तशी त्याची हरवलेली ऊर्जा त्याला परत मिळाली. त्यामुळे तो ताजातवाना दिसू लागला. प्राणायाम केल्याने चांगला फायदा होतो आणि मनाचं तसंच शरीराचंही आरोग्य सुधारतं. वेळेचं नीट व्यवस्थापन केल्याने तसंच आपल्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करून दिवसाचे कार्यक्रम आखल्यास शरीर आणि मन यांचा एकमेकांशी चांगला ताळमेळ साधला जातो; परिणामी आरोग्य चांगलं राहतं. शरीर आणि मन म्हणजे दोन वाद्य आहेत आणि ती दोन्ही एकाच सुरात वाजली तरच आरोग्याचे सूर जुळतात.. अन्यथा बिघडतात. संगीताचे सूर आपलं मन प्रसन्न करतात, पण कर्णकर्कश आवाज शरीराला आणि मनालाही वेदना देतात ना, तसंच आहे.

मिताली आणि रणधीर ही इयत्ता बारावीत शिकणारी जुळी भावंडं. मांजरं भांडतात ना तशी ती दोघं घरात एकमेकांशी भांडायची. टीव्ही, संगणक, घरातला खाऊ या आणि अशा कोणत्याही क्षुल्लक विषयावरून त्यांची भांडणं व्हायची. पालक, नातेवाईक एवढंच काय, पण समुपदेशकाने केलेली मध्यस्थीसुद्धा कामी येत नव्हती. एकदा टीव्हीवरचा एक कुकरी शो पाहून रणधीरने तो पदार्थ स्वत: करून पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तोच त्याच्या आईने ‘मुलाने स्वयंपाकघरात जाण्याची काही गरज नाही. मुलांनी स्वयंपाक कशाला शिकायला पाहिजे?’ असं बोलून त्याचा हिरमोड केला. खरं तर त्याच्या मनातील संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची त्याची इच्छा होती आणि त्याला ते करू देण्याची तीच खरी वेळ होती. मी त्याला त्याच्या आवडीनुसार स्वयंपाकघरात जाऊन पदार्थ करून पाहण्याची परवानगी दिली. हळूहळू नवीन पदार्थ करून पाहणं त्याला आवडू लागलं आणि तो स्वयंपाकघरात रमू लागला. त्याचा वेळ चांगला जाऊ लागल्यामुळे त्याची भांडखोर वृत्तीसुद्धा कमी होऊ लागली. मुलं जेव्हा स्वत:हून घरातील काही कामे करू पाहतात ना, तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्या संकल्पनेनुसार त्यांना ते करू दिलं म्हणजे त्यातून मनाला एक प्रकारची उभारी येते आणि आपण आज काहीतरी केलं या विचाराने मनाचं आरोग्य सुधारतं. ‘कौतुक केलं की अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटतं’ असं आपण म्हणतो ना, तसंच आहे हे. भावनिक ऊर्जेचं खातं अशा मनाला उभारी देणाऱ्या गोष्टींमुळेच नेहमी भरलेलं राहतं आणि मग या खात्यात बरीच ऊर्जा साठवली जाते.. खात्यात पैसे साठवतो तशी. ज्या घरातील तरुण मुलं आनंदाने घरातील कामं करतात किंवा खेळीमेळीने घरात वावरतात त्या घरातील मुलं इतर मुलांपेक्षा जास्त उत्साही दिसतात. देवाची किंवा प्रार्थनेची खोली घराचा आत्मा नसते, तर स्वयंपाकघर हा घराचा आत्मा असतो. रणधीर घरातल्या कामांमध्ये रमला, पण मितालीला घरातील कामांचा तिटकारा होता. एकदा ती तिच्या महाविद्यालयातून एका प्रकल्पासाठी डहाणू येथील तलासरी येथे गेली होती. तिथे आदिवासी लोकांसाठी काम करणाऱ्या एका समाजसेविकेशी तिची ओळख झाली. प्रकल्पाचा एक भाग म्हणून दिवसभर तिथे राहिल्यानंतर मितालीला एका वेगळ्याच दुनियेची ओळख झाली. एरवी घरात पालकांशी खेकसून बोलणारी, आकांडतांडव करणारी मिताली बाहेरचं वेगळ जग बघून भारावून गेली. त्यानंतर जणू तिला एक दिशा मिळाली आणि दर आठवडय़ाला ती तिथे स्वयंसेवक म्हणून जाऊन आदिवासी पाडय़ातील मुलांना शिकवू लागली. एवढंच नाही तर तेथील आदिवासी बायकांकडून तिने त्यांची चित्रकला शिकून घेतली. आयुष्याला एक दिशा मिळाली की मानसिक आरोग्य अधिक चांगलं होतं आणि भावनिकदृष्टय़ासुद्धा तुम्ही ताकदवान होता. भावनिक ऊर्जा आणि भावनिक संपत्ती अशा आवडीच्या कामांतून मिळत जाते.. वाढत जाते. मितालीने अभ्यासावरसुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केली, अर्थात याची प्रेरणा तिला आदिवासी पाडय़ातील मुलांकडून मिळत होती. घरच्यांबरोबर सुद्धा तिचं चांगलं नातं निर्माण होऊ लागलं. सेवा आणि घरातील कामं मनाचे स्नायू बळकट करतात आणि आवडीच्या कामासाठी वेळ दिल्यामुळे भावनिक आरोग्य वाढीस लागून आपला आत्मा सुखावतो.

अनेक वेळा पालक आपल्या मुलांना परीक्षेत गुणांच्या उंच इमारती बांधा म्हणून मागे लागतात. सगळं आयुष्य त्या परीक्षा, करिअर आणि गुणांची स्पर्धा याच्यात बांधलं जातं. करिअरच्या शर्यतीत धावायला शिकवलं जातं आणि भरपूर पैसा कमविण्याचा पाठलाग सुरू होतो. पण या धावपळीत मानसिक शांतता, समाधान याचा विचार केला जात नाही, फक्त बँकेतील खात्यात भरपूर पैसा कसा पडत राहील याचा विचार होत राहतो. ही जीवघेणी स्पर्धा आणि पैसा एके पैसा कमविण्यासाठी सुरू केलेला त्या पैशांचा पाठलाग माणसाला पैसा असूनही एकटेपणाकडे घेऊन जातो.. आयुष्यात शून्यता आल्यासारखं वाटायला लागतं. करिअरमध्ये यशस्वी झालेली अनेक तरुण मुलं-मुली मग मानसिक शांतीसाठी अचानक कुठल्या तरी गुरूच्या पायावर लोटांगण घालायला लागतात. हे त्यांच्या बाबतीत घडतं जे लोक आपल्या शरीरात आत्मा नावाची चीज अस्तित्वात आहे हेच विसरतात आणि आपल्या शरीराला आत्मिक समाधानाचीही गरज असते, शरीराप्रमाणेच मनालाही पौष्टिक आहार द्यावा लागतो, या गोष्टी मानत नाहीत त्यांना मानसिक शांतीसाठी अशा इतर बाह्णा गोष्टींची मदत घ्यावी लागते. धावून धावून शरीर थकून जातं, पण मन जर ताजंतवानं असेल तर शारीरिक थकवा लवकर दूर होतो. अर्थात मन ताजंतवानं राहण्यासाठी त्यालाही थोडा वेळ, शांती, समाधान मिळेल असं दिवसभरात काही तरी करायला हवं. नाही तर जीवघेणी स्पर्धा आयुष्य संपवते. तरुण पिढीच्या मनातील राग, आक्रमकपणा किंवा द्वेष हा नेहमी नैराश्यातून किंवा ताणतणावातूनच येतो असं नाही तर बऱ्याच वेळा तो आयुष्याचं ध्येय सापडलं नसल्यामुळे सुद्धा येतो. यात त्यांचा दोष नाही. मुलांना हॉटेलमध्ये जेवायला नेलं आणि एक-दोन चांगल्या वस्तू, आवडती खेळणी घेऊन दिली की काम झालं असं पालकांना वाटत असतं, पण ते चुकीचं आहे. केवळ या गोष्टींनी मानसिक आरोग्य बळकट होत नाही. मुलांना त्यांच्या आतमध्ये दडलेली प्रकाशाची वाट शोधायला मदत करा.. व्यायामशाळेत जाऊन शरीर पीळदार बनविण्याइतकीच मनाची सुदृढताही महत्त्वाची आहे.
तुमच्या आत एक गुरू आहे, जो मनाची कवाडे उघडी केलीत तर दिसेल. तो गुरू भेटला की वेगळा गुरू बाहेर जाऊन शोधायची गरज भासणार नाही. तुमचं मन तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आणि गुरूसुद्धा आहे. फक्त दिवसातील काही मिनिटं त्याच्याशी बोला, संवाद साधा. शरीर दमतं तसंच मनसुद्धा दमतं, तेव्हा त्याला काही क्षण विश्रांती द्या. कार्यालयीन कामं, इतर चिंता-काळज्या काही मिनिटांसाठी दूर ठेवा आणि शांतपणे मनाचं ऐका.. तुम्हाला योग्य तो संदेश आतून मिळेल. चांगल्या प्रकारे जगणं आणि चांगले विचार घेऊन जगणं हे केव्हाही उत्तमच.. पण या दोन्ही गोष्टी तेव्हाच एकत्रपणे साध्य होतील जेव्हा भावनिक किंवा तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची संपत्ती बनेल तेव्हा.
(उत्तरार्ध पुढील भागात)
(लेखात आलेली व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)
डॉ. हरीश श़ेट्टी – harish139@yahoo.com
शब्दांकन – मनीषा नित्सुरे-जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 1:17 am

Web Title: article on children mental health
टॅग : Mental Illness
Next Stories
1 गॅजेट्सचं आरोग्यशास्त्र
2 मला वेड लागले.. गॅझेट्सचे!
3  रोजच्या जगण्यातले आरोग्यशास्त्र
Just Now!
X