22 April 2019

News Flash

‘मोबीस्टार’चा ‘नॉच’वाला फोन

‘नॉच डिस्प्ले’ ही संकल्पना सध्या स्मार्टफोन क्षेत्रातील ताजी घडामोड आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘नॉच डिस्प्ले’ ही संकल्पना सध्या स्मार्टफोन क्षेत्रातील ताजी घडामोड आहे. स्मार्टफोनचा आकार आटोक्यात ठेवतानाच त्याचा डिस्प्ले मात्र जास्तीत जास्त कसा देता येईल, याचा प्रयत्न स्मार्टफोन निर्माते करू लागले आहेत. अनेक कंपन्यांनी तीन बाजूंनी काठोकाठ व्यापलेले डिस्प्ले पुरवले, मात्र स्मार्टफोनच्या वरच्या बाजूस पुरवावा लागणारा स्पीकर, कॅमेरा आणि सेन्सर यांच्यासाठी जागा सोडावीच लागत होती. त्यावर उपाय म्हणूनच कंपन्यांनी ‘नॉच डिस्प्ले’ची संकल्पना जन्माला घातली. वरील तिन्ही गोष्टी कमीत कमी जागेत आणून उरलेली जागा डिस्प्लेनी भरून काढण्याच्या या तंत्राला ‘नॉच डिस्प्ले’ म्हणतात. गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात आलेले बहुतांश नवीन स्मार्टफोन हे ‘नॉच डिस्प्ले’चा अंतर्भाव असलेले आहेत. आता परवडणाऱ्या स्मार्टफोनच्या श्रेणीतही हे ‘नॉच डिस्प्ले’ झळकू लागले असून ‘मोबीस्टार’ या कंपनीने ‘एक्स १ नॉच’ हा नवीन स्मार्टफोन नुकताच बाजारात आणला आहे.

या फोनच्या बॉक्समध्ये मोबाइलखेरीज बॅककव्हर, चार्जिग अ‍ॅडाप्टर, यूएसबी केबल, हेडफोन आणि सिम इजेक्टर पिन पुरवण्यात आली आहे. दोन जीबी रॅम आणि १६ जीबीअंतर्गत स्टोअरेज किंवा तीन जीबी रॅम आणि ३२ जीबीअंतर्गत स्टोअरेज अशा दोन प्रकारांमध्ये हा स्मार्टफोन दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. ‘एक्स १ नॉच’वर प्रथमदर्शनी नजर टाकता या फोनची मागील बाजू लक्ष वेधून घेते. मागील बाजूला अतिशय ‘ग्लॉसी फिनिश’ पुरवण्यात आला असून ग्रॅडियंट शाइन, सफायर ब्ल्यू आणि मिडनाइट ब्लॅक अशा तीन रंगांत हा फोन मिळतो. यापैकी ‘ग्रॅडियंट शाइन’ असलेल्या मागील बाजूकडे पाहिल्यावर हा फोन ‘प्रीमियम’ श्रेणीतील असल्यासारखे जाणवते. मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर आणि १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा व एलईडी फ्लॅश पुरवण्यात आला आहे. पुढील बाजूला ५.७ इंचाचा डिस्प्ले असून ‘नॉच डिस्प्ले’मुळे त्याचा काठोकाठ व्यापून गेला आहे. फोनच्या उजव्या बाजूला सिमकार्ड ट्रे असून त्यात डय़ुअल सिमसह मायक्रोएसडी कार्डसाठी जागा पुरवण्यात आली आहे. ‘व्होल्ट-ई’ तंत्रज्ञानाने युक्त  असल्याने अतिशय कमी किमतीत वेगवान इंटरनेटची सेवा पुरवणारे सिम कार्ड तुम्हाला यात टाकता येते. डाव्या बाजूला आवाजाची बटणे आणि पॉवरची बटणे पुरवण्यात आली आहेत.

दोन जीबी आणि तीन जीबी अशा दोन प्रकारच्या रॅममध्ये हा फोन उपलब्ध आहे. यामध्ये क्वाडकोअर मीडिया टेक हेलियो ए२२ चा दोन गिगाहार्ट्झचा प्रोसेसर फोनमध्ये पुरवण्यात आला आहे. फोनमध्ये बॅटरीही ३०२० एमएएच क्षमतेची असून ती व्यवस्थितपणे काम करते. अँड्रॉइडची सर्वात प्रगत आवृत्ती असलेल्या ८.१ वर हा फोन काम करतो.

या फोनचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यातील कॅमेरे. या फोनमध्ये मागे व पुढे प्रत्येकी १३ मेगापिक्सेलचे कॅमेरे पुरवण्यात आले असून ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’च्या आधारे ते काम करतात. दोन्ही कॅमेऱ्यांतून येणारी छायाचित्रे चांगल्या दर्जाची असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. कॅमेऱ्यांमधून १०८०पीपर्यंतचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याची सुविधा या फोनमध्ये असून फेस ब्युटी मोड आणि बोकेह मोडमुळे छायाचित्रण अधिक आकर्षक बनले आहे.

First Published on February 7, 2019 12:31 am

Web Title: article about mobiistar mobile phone