आपल्या घरात वापर संपलेल्या काचेच्या बरण्या (उदा. जॅम, सॉसच्या बाटल्या) पडून असतात. अशा बरण्यांचा वापर काही जण अन्य वस्तू ठेवण्यासाठी वगैरे करतात. मात्र, आता स्वयंपाकघरातील सर्व डबे एकाच ढंगाचे, रंगाचे असावेत यासाठी या काचेच्या बाटल्या किंवा बरण्या आतील जिन्नस संपल्यावर सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्या जातात किंवा भंगारात दिल्या जातात. मात्र, या बाटल्यांपासून तुम्ही आकर्षक फुलदाण्या बनवू शकता.

साहित्य

दोन किंवा तीन सारख्याच आकाराच्या काचेच्या बरण्या, काच रंगवण्यासाठी अ‍ॅक्रेलिक कलर, जाळीदार पोत्याचे तुकडे, सुतळी.

कृती

सर्वप्रथम बरण्या आतून-बाहेरून चांगल्या धुऊन घ्या. त्यावरील स्टिकर व्यवस्थित काढा. त्यावरील गम किंवा अन्य धूळ हटवण्यासाठी तुम्ही स्पिरिट लावून स्वच्छ कपडय़ाने त्या पुसून घ्या आणि व्यवस्थित कोरडय़ा होऊ द्या. या बरण्या अ‍ॅक्रेलिक पेंटने रंगवा आणि रंग वाळू द्या. जाळीदार पोत्याचे किंवा गोणपाटाचे बाटलीचा मध्यभाग व्यापतील (छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे) इतक्या रुंदीचे आणि बरणीच्या परिघाइतक्या लांबीचे समान तुकडे करा आणि ते बरणीभोवती गुंडाळून फेव्हिकॉलने चिकटवा. बरणीच्या गळय़ापाशी सुतळीची चौफुली गाठ मारा. तुम्ही यावर आपल्याला हवी ती अक्षरे कापून चिकटवू शकता. आता तयार झालेल्या फुलदाणीमध्ये कृत्रिम फुले ठेवून ती सजवा.

(छायाचित्र सौजन्य : https://craftsbyamanda.com/)