झाडं लावण्याचे प्रत्येकाचे उद्देश निरनिराळे असतात. पण त्या हिरवाईमुळे आपोआपच आल्हाददायक वातावरण निर्माण होतं. सामान्यपणे काळ्या किंवा मातकट रंगाच्या प्लास्टिक किंवा मातीच्या कुंडय़ांमध्ये झाडं लावली जाता. पण कल्पकता असल्यास आपली बाल्कनी इतरांपेक्षा निश्चितच वेगळी दिसू शकते.

प्लास्टिकच्या बाटल्या हे त्यातील सर्वांत सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेलं साहित्य. मिनरल वॉटरच्या बटल्यांचे उभे दोन भाग करून दोन्ही भागांत झाडं लावता येतात. बाटलीचा एक चौकोनी तुकडा कापून काढला तर आडवी कुंडी मिळेल. आवड असल्यास त्या अRेलिक रंगांनी रंगवून आणखी आकर्षक करता येतात. पत्र्याच्या डब्यांचा, तेलाच्या कॅनचाही असाच पुनर्वापर करता येतो. टाकाऊ हेल्मेटमध्ये शोभेची झाडं लावता येतील. पाण्याचा माठ गळू लागला की तो कचरम्य़ात जातो. त्यात एखादं मोठं वाढणारं झाड आनंदाने वाढतं. लोणच्याच्या बरण्याही अशाच प्रकारे वापरता येतील. प्लास्टिकच्या मोठय़ा पिंपात फळझाडे वाढू शकतील एवढी माती राहते. ज्यांच्याकडे गच्ची आहे किंवा आवारात जागा आहे, अशांनी हा प्रयोग नक्की करावा.

जुन्या झालेल्या बुटांचा जोड कुंडीसारखा वापरता येतो आणि त्याच्या लेस खिळ्याला बांधून व्हर्टिकल गार्डनचा प्रयोग करता येतो. टायर सिलिंगला लटकवून त्याच्या अध्र्या भागात माती भरून त्यातही झाडे लावता येतात. फुटके टब, बादल्या, मग, बॉल, बॅग कशातही झाड लावता येतं. भेटवस्तू म्हणून घरात अनेक मग साठतात. त्यात छोटं काटेरी शोभिवंत झाड लावून घरातल्या टेबलवर ठेवलं, तर नक्कीच आकर्षक दिसतं. अशाच भेटवस्तू भरलेल्या टोपल्या परडय़ांचा वापर कुंडय़ांप्रमाणे करता येतो.

फक्त आपण ज्या वस्तूत झाड लावणार आहोत, त्यात ते जगेल, तगेल की नाही, याची माहिती घ्यावी. तेवढं केल्यास आपली बाल्कनी इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आणि आकर्षक ठरेल.