ऋषिकेश बामणे

समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी, आजही समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. नजीकच्या काळात तो बदलेल, अशी चिन्हेही नाहीत. समलिंगींची हेटाळणी, त्यांच्या संबंधांना कुटुंबातून होणारा विरोध, त्यांच्यावरील शारीरिक-मानसिक अत्याचार यांच्या असंख्य कथा आजही पडद्याआड आहेत. समाजाकडून आपल्याला साथ मिळणार नाही, या विचाराने खुद्द समलिंगीही याची उघड वाच्यता करत नाहीत. असे असले तरी, अनेक नामवंतांनी आपण समलिंगी आहोत, हे जाहीर करण्याचे धाडस दाखवले. यात क्रीडापटूंची संख्या लक्षणीय आहे. अशाच काही धैर्यवान क्रीडापटूंचा आढावा.

द्युती चंद : धावपटू

भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदने काही दिवसांपूर्वीच तिचे एका १९ वर्षीय मुलीशी समलैंगिक संबंध असल्याचे जाहीर केले. समलैंगिक संबंधाविषयी मोकळेपणाने जाहीर करणारी द्युती ही पहिली भारतीय क्रीडापटू ठरली आहे. २३ वर्षीय द्युती सध्या जागतिक अजिंक्यपद आणि टोक्यो ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे, मात्र त्यानंतर तिने आपल्या प्रेमिकेशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. द्युतीची प्रेमिका सध्या भुवनेश्वर येथे बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत असून गेल्या पाच वर्षांपासून या दोघींचे प्रेमप्रकरण सुरू आहे. द्युतीच्या या कृत्याला कुटुंबातून विरोध होत आहे. म्हणूनच तिने समाजासमोर आपली इच्छा व्यक्त केली आहे.

भारतातील परिस्थिती

सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी ६ सप्टेंबर, २०१८रोजी समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७७ मधील समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्या. या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

मार्टिना नवरातिलोव्हा : टेनिस

मूळची चेक प्रजासत्ताकची नामांकित महिला टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हाने अमेरिकेत स्थायिक झाल्यावर ‘न्यू यॉर्क’ डेली या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण समलिंगी असून अमेरिकेच्याच सुप्रसिद्ध लेखिका रिटा ब्राऊनशी आपले संबंध आहेत, हे जाहीर केले होते. जागतिक स्तरावर प्रथमच एखाद्या महिलेने असे खुलेआमपणे जाहीर केल्यामुळे सर्वानीच मार्टिनाचे कौतुक केले. मात्र त्यानंतर काही वर्षांनी मार्टिना व रिटा यांचे संबंध बिघडले. २०१४मध्ये मार्टिनाने जुलिआ लेमिगोव्हा या दुसऱ्या महिलेशी विवाह केला.

हिली जेन्सन-निकोला हॅनकॉक : क्रिकेटपटू

न्यूझीलंडची क्रिकेटपटू हिली जेन्सनने ऑस्ट्रेलियाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही न केलेल्या निकोला हॅनकॉकसह एप्रिल महिन्यात विवाह केला. या दोघी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश क्रिकेट लीगमध्ये मेलबर्न स्टार्स संघाचे प्रतिनिधित्व करतात. न्यूझीलंडमध्ये २०१३ एप्रिलपासून समलैंगिक विवाहाला परवानगी देण्यात आली असून ऑस्ट्रेलियामध्ये हा कायदा डिसेंबर २०१७मध्ये मान्य करण्यात आला.

फॉकनरच्या छायाचित्रावरून चर्चा

२०१५च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत सुरेख गोलंदाजी करून सामनावीराच्या पुरस्कारासह ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या जेम्स फॉकनरने २९ एप्रिल रोजी इन्स्टाग्राम खात्यावर टाकलेल्या एका छायाचित्राने वेगळीच खळबळ उडाली. वाढदिवशी ‘ माझी आई आणि बॉयफ्रेंड रॉब जुब’ अशी फोटोओळ असलेले छायाचित्र त्याने टाकल्याने समाज-माध्यमांवर फार चर्चा रंगली. परंतु दुसऱ्याच दिवशी फॉकनरला आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे निदर्शनास आले व त्याने या छायाचित्रामागील कारण स्पष्ट करून आपण समलिंगी नसल्याचे जाहीर केले. ‘‘रॉब आमच्यासोबत राहण्यासाठी आला त्याला काल (२९ एप्रिलला) पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे मी ते छायाचित्र टाकले होते,’’ असे फॉकनरने सांगितले.