23 April 2019

News Flash

पत्रातलं प्रेम

प्रेम हे चिरंतन आणि शाश्वत असते. अनादी कालापासून ते अनंतापर्यंत प्रेम भावना राहणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

प्रेम हे चिरंतन आणि शाश्वत असते. अनादी कालापासून ते अनंतापर्यंत प्रेम भावना राहणार आहे. काळाप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग बदलत असतात. प्रेमपत्र हे प्रेम जुळविण्याचे आणि भावना व्यक्त करण्याचे माध्यम होते. स्मार्टफोन आणि समाजमाध्यमे नसताना प्रेमपत्र हाच आधार होता. अलंकारिक शब्दांची जुळवाजुळव करून प्रेमपत्रे लिहिली जात होती. आज आवडत्या व्यक्तीपर्यंत काही क्षणात पोहोचण्याचे अनेक माध्यमे सहज उपलब्ध आहेत. अशा वेळी प्रेमपत्रं कालबाह्य़ झाली आहेत का? प्रेमपत्रं लिहिली जात नाहीत का, या प्रश्नाचे उत्तर तरुणाईच्या भाषेत..

दीपिका धुरी म्हणते, खरे तर प्रेमाची सुरुवात प्रेम पत्रातूनच होते. प्रेमव्यक्त करण्याची सोपी पद्धत म्हणजेच प्रेमपत्र. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे त्या व्यक्तीसमोर काही बोलता येत नाही. यामुळेच आपण त्यांना प्रेमपत्र लिहितो. आपल्या मनातील सगळ्या भावना आपण लिहून काढतो आणि ते प्रेमपत्र आपण त्या व्यक्तीला देतो. ती व्यक्तीसुद्धा जर प्रेम करीत असेल तर हे प्रेमपत्र सांभाळून ठेवते. त्यामुळे आजच्या काळातही जुन्या जमान्यासारखे प्रेमपत्र लिहून प्रेम व्यक्त करायला मला तरी खूप आवडेल. असे दीपिका सांगते. पत्रातून व्यक्त करू शकतो तशा भावना इतर कुठल्याही माध्यमातून व्यक्त होऊ शकत नाहीत.

या तंत्रज्ञानाच्या जगात मी आजही माझ्या जवळच्या माणसांना पत्र लिहिते, असे रसिका म्हात्रे म्हणाली. कारण पत्र हे असे माध्यम आहे ज्यात मला समोरासमोर बोलता येते त्यापेक्षा कितीतरी पटीने पत्रातून व्यक्त होता येते आणि समोरच्यालाही ते वाचताना माझ्या मनातली भावना नक्कीच कळत असावी. कारण एखादी मनापासून गेलेली गोष्ट, मनातली इच्छा, संदेश, राग, माफी मागणे जवळच्या व्यक्तीपाशी ते पोहोचवणे यासाठी पत्रापेक्षा उत्तम पर्याय कोणता असूच शकत नाही, असे रसिकाला वाटते.

सिद्धेश भाबल म्हणाला, की हो पत्र लिहून प्रेम व्यक्त करायला आवडेल. पण आताच्या काळात पत्र लिहायचे म्हणजे बोलण्यासाठी, सांगण्यासाठी काहीतरी हवे असते. मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांमुळे सतत एकमेकांना संदेश करणे, व्हीडिओ कॉल करणे सुरू असते. त्यामुळे पत्रातून व्यक्त व्हायला जी ओढ लागते ती आमच्या पिढीला माहीतच नाहीये. त्यामुळे एकूणच प्रेमाची नाजूक हळवी भावना बाजूला पडतेय हे खरे, अशी खंतही सिद्धेशच्या मनात आहे.

तर मराठी भाषेवर जिवापाड प्रेम करणाऱ्या स्वप्नालीने याविषयी तिच्या प्रेमाविषयीचा सुंदर किस्सा सांगितला. ती म्हणते तिच्या प्रियकराशी तिची फेसबुकमुळे मैत्री झाली. पण तिला प्रेम व्यक्त करायचं होतं तेव्हा तिने भाषेतून व्यक्त होण्यासाठी पसंती दिली. ती म्हणाली की मी सुंदर मराठी भाषेत प्रेमपत्र लिहिले. त्याला नेऊन दिले, तर त्याने सांगितलं की मला मराठी भाषा कळत नाही, तूच वाचून दाखव. तेव्हा तिनेच ते पत्र त्याला वाचून दाखवले. त्यानंतर काहीच दिवसात त्यांचे प्रेम होकारात बदलले. आज ते दोघेही एकत्र आहेत. याचे सारे श्रेय ती त्या प्रेमपत्राला देते. कारण तांत्रिक माध्यमातून व्यक्त केलेली प्रेमभावना क्षणिक असते. तर पत्रातून व्यक्त केलेली भावना अधिक गहिरी असते, असे ती सांगते.

डिजिटल पत्रे

* प्रेम ही खूप हळुवार भावना आहे. प्रेमपत्रे सिनेमांमध्ये पाहिली आहेत. पण प्रत्यक्षात कधी संबंध आलेला नाही. आम्ही तरुणसुद्धा पत्रे, प्रेमपत्रे लिहितो, मात्र ती डिजिटल असतात. ती साठवून ठेवण्यासाठी ही फार मेहनत घ्यावी लागत नाहीत. व्यस्त वेळापत्रकातही ती मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेटवर पुन:पुन्हा वाचता येतात.

* प्रेमपत्र हे मी माझ्या भाषेत लिहून त्याला डिजिटल इमोजीच्या साहय्याने बोलके करता येतात. लिहिण्याची सवयच मोडलेली आहे, वळणदार अक्षरांची वळणेच बिघडलेली आहेत. त्यामुळे सुचेल तेव्हा पटकन लिहिण्यासाठी डिजिटल हे माध्यम वापरते, असे जस्मिन तांबोळी सांगते.

* डिजिटल पत्राला सायली सुर्वेसुद्धा दुजोरा देते. प्रत्यक्ष प्रेम पत्र लपवायचे कुठे हा मोठा प्रश्न असतो, यात धोका असतो. डिजिटल हे आपल्या वैयक्तिक पासवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये ठेवता येतात, असे सायली सांगते.

प्रेमाचे नाटक कशाला करायचे?

व्हॅलेंटाइन डे जवळ आला की प्रेमवीरांच्या भावना अधिक तीव्र होत असतात. ‘खूप प्रेम करते मी तुझ्यावर सोडून मला जाऊ नकोस, कळत नकळत प्रेम केले मी तुझ्यावर वाट पहायला लावू नकोस..’अशा आशयापासून ते ‘अध्र्या वाटेवर सोडायचे होते, तर स्वप्न दाखवायचे कशाला, प्रेम नव्हते माझ्यावर, तर प्रेमाचे नाटक करायचे कशाला..’ अशा आशयापर्यंत प्रेमाच्या विविध भावना हळव्या मनात दाटून येत असतात. डिजिटल युगात व्यक्त होण्याची अनेक माध्यमे आहेत. परंतु आजही बहुतांश तरुणाईला प्रेमपत्राला पसंती देत असतात.

First Published on February 13, 2019 12:15 am

Web Title: article on love letter