संतोष बडे

गोल्ड कोस्ट म्हणजे दक्षिणेतील मायामी. तिथे अप्रतिम समुद्रकिनारा आहे. उसळणाऱ्या लाटांवर स्वार होऊन सर्फिगचा आनंद घेण्यासाठी जगभरातून सर्फर्स इथे येतात. गोल्ड कोस्टला सर्फर्स पॅराडाइज म्हटले जाते. हे एक टुमदार खेडेच म्हणायला हवे. पण आधुनिक शहराला लाजवतील अशा सोयी-सुविधांनी सज्ज खेडे. गगनचुंबी इमारती, अतिशय कल्पकरीत्या बांधलेले व्हिला, प्रशस्त रुंद रस्ते आणि अनेकविध शॉपिंग सेंटर इथे आहेत.

गोल्ड कोस्टमध्ये पर्यटकांसाठी विविध प्रकारची आकर्षणे उपलब्ध आहेत. सर्व वयोगटांतील लोकांसाठी अनेक पर्याय आहेत. वेट अँड वाइल्ड वॉटर थीम पार्क आहे. वॉर्नर ब्रदर स्टुडिओ, सी वर्ल्ड अम्युजमेंट पार्क आहे. पण त्याचबरोबर काही भन्नाट जागा आहेत. त्यापैकी एकाठिकाणी तुम्हाला मोठय़ा संख्येने पेलिकन पक्षी पाहायला मिळतात. लॅब्राडॉर भागात असलेल्या एका हॉटेलातील वेटरने काही वर्षांपूर्वी उरलेले मासे हॉटेलच्या मागील भागातील लगूनमधील पेलिकन पक्ष्यांना घातले. त्यानंतर ते पक्षी रोजच येऊ लागले. मग तो शिरस्ताच बनून गेला. आता दररोज दुपारी साधारण दीड वाजता हे पेलिकन तेथे हजेरी लावतात. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते. त्यामुळे त्या हॉटेलचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. त्यांच्याकडूनच हा खाद्य पुरवठाही सुरू असतो. माशाचा एखादा जरी तुकडा मिळाला तरी पेलिकन तेवढाच तुकडा घेऊन आकाशात झेपावतात. मासे मिळावेत म्हणून त्यांच्यात चढाओढ होतेय किंवा कोणी एक दुसऱ्याचा तुकडा पळवतोय असे होत नाही. आकाशात झेपावताना या पक्ष्यांच्या पंखांचा अंदाज येतो. ते साधारण आठ-दहा फूट लांबीचे असतात.

हाच अनुभव घेण्यासाठी सिडनी जवळ १०० किलोमीटर अंतरावर द एंट्रन्स नावाचे एक गाव आहे तिथे पर्यटकांना बसमधून सशुल्क नेण्यात येते. पण गोल्ड कोस्टमध्ये हा अनुभव संपूर्णपणे मोफत मिळतो. खरं तर नैसर्गिक जीवनसाखळीत प्रत्येक पक्षी-प्राण्याला त्याचे अन्न शोधता येतेच. असे अन्न देणे थोडे कृत्रिम ठरू शकते. पण किमान हे अन्न त्यांचे नैसर्गिक अन्न आहे हे महत्त्वाचे. अन्यथा आपल्याकडे फरसाण, वेफर्स देतात तसे येथे भविष्यात घडू नये इतकीच अपेक्षा

गोल्ड कोस्टपासून अंदाजे ९० किलोमीटर अंतरावर ब्रिस्बेन शहराजवळ लोन पाइन कोआला अभयारण्य आहे. ते ४४ एकर परिसरात वसले आहे. ते जगातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य आहे. आज येथे १३० कोआलांचे वास्तव्य आहे.

कोआला हा प्राणी अस्वलासारखा दिसतो, पण अतिशय निरागस चेहरा व संपूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे. त्याचे आवडते खाद्य म्हणजे निलगिरीची पाने त्यामुळे तो निलगिरीच्या झाडावरच राहतो. चार-आठ दिवसांनी कधीतरी खाली उतरला तर उतरला नाहीतर सर्वकाही झाडावरूनच सुरू असते. कायमच निलगिरीची पाने खात असल्यामुळे त्याला ना कधी सर्दी होत ना काही आजार. कोआलाचे पिल्लू अतिशय चौकस असते. त्याला जोयी म्हणतात. आजूबाजूला काय चाललंय याची त्याला फारच पंचायत पडलेली असते.

पूर्ण वाढ झाल्यानंतर कोआला झाडावरच झोपा काढणे पसंत करतात. दिवसातले साधारण वीस तास तरी ते झोपतात आणि हालचाल फार जलद नसल्याने, अतिशय संथ गतीने चालत असल्याने अनेकदा रस्ता ओलांडताना वाहनांचा धक्का लागून मृत्युमुखी पडतात. कोआला असलेल्या भागात सरकारतर्फे रोड साइनस् लावलेल्या दिसतात. प्रत्येक कोआलाची झोपतानाची पोज फार मजेशीर असते. चेहरा इतका निरागस असतो की आपण त्याच्यावर रागावूच शकणार नाही.

यांच्या जन्माची कथा एकदमच वेगळी आहे. गर्भधारणा झाल्यावर अपरिपक्व गर्भ मादीच्या शरीराच्या बाहेर येऊन स्तनांजवळ असलेल्या एका पिशवीत वाढतो. पूर्ण वाढ झाल्यावरच पिशवीतून बाहेर येतो. या लोन पाइन अभयारण्यात त्यांच्या संवर्धनाचे विशेष काम केले जाते. कोआला एन्काऊंटर म्हणजेच कोआलाला हाताळू शकता, जवळून पाहू शकता. एकेकाळी नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या या प्राण्यांची संख्या साधारण ३० हजारांवर गेली आहे. झगमगीत ऑस्ट्रेलियातील ही ठिकाणं मुद्दाम वेळ काढून पाहावीत अशीच आहेत.

अन्य प्राणी-पक्षी

या अभयारण्यात आपण तास्मनियन डेविल या भयानक रूप असलेल्या प्राण्यांनाही पाहू शकता तसेच कांगारूला आपल्या हाताने खाद्य भरवू शकता. इथे अनेक प्रकारचे पॅराकेट, मगरी, प्लॅटीपस नावाचा अंडी देणारा सस्तनप्राणी, एचीदना नावाचा साळींदरासारखा प्राणी व अनेक प्रकारचे रंगीत पोपट, कोकेटू पक्षी, घुबडं, वटवाघुळं पिंजऱ्यात व नैसर्गिक अवस्थेत दिसतात. इथे मेंढय़ांचा कळप राखणारा बिंगो नावाचा कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी आणि त्याचा मेंढय़ांची राखण करतानाचा अनुभव रोज घेऊ  शकता.