27 January 2021

News Flash

‘स्तनपान साक्षर’ व्हा!

बऱ्याच महिलांना स्तनपानावेळी स्तनाग्र दुखणे, त्यांना जखम होणे, स्तनांना सूज येणे. जंतूसंसर्ग होऊन पू होणे असे अनेक त्रास होतात.

डॉ. तेजश्री तहसीलदार, स्त्री रोगतज्ञ आणि स्तनपान समुपदेशक.

‘डॉक्टर मला प्रचंड त्रास होतोय आता! बाळासाठी म्हणून मी सहन करत पाजत होते. पण आता दूध पाजताना होणारा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेलाय.’ डोळय़ात पाणी आणून एक त्रस्त आई सांगत होती.

बाळाला स्तनपानाचा देणे सर्वासाठी सुखकारक नसते. बऱ्याच महिलांना स्तनपानावेळी स्तनाग्र दुखणे, त्यांना जखम होणे, स्तनांना सूज येणे. जंतूसंसर्ग होऊन पू होणे असे अनेक त्रास होतात. बाळासाठी काहीही सहन करण्याची आईची मानसिकता असते. त्यामुळे त्या दुखण्याकडे लक्ष न देता महिला उपाययोजना न करता तसेच पाजत राहातात. परिणामी त्रास वाढत जाऊन रोग बळावतो.

स्तनपान हे वेदनारहित असते. स्तनपान देताना होणाऱ्या वेदना हे काहीतरी चुकीचे होतेय याचे संकेत देतात.

स्तनपान हा प्रत्येक बाळाचा मूलभूत अधिकार आहे. तर आईसाठी ते स्वर्गसुख आहे. स्तनपानावेळी होणाऱ्या दुखण्यातून आईला स्तनपान सोडावे लागणे हे खूपच दु:खदायक आहे. यातून आई आणि बाळ दोघांचेही नुकसान होते.

योग्य तो सल्ला आणि उपाययोजनेने स्तनपानाचा प्रवास सुकर होऊ शकतो. यासाठी महिलांनी स्तनपानविषयक योग्य ती माहिती घेऊन ‘स्तनपान साक्षर’ व्हावे.

वेदना का होतात?

 •      स्तनपान करताना बाळाने केवळ स्तनाग्रांना केलेली पकड हे बऱ्याचदा दुखण्याचे कारण असते.
 •     स्तनपानावेळी स्तनाग्रांसोबत त्या बाजूचा काळा भागदेखील बाळाने तोंडात घेतला पाहिजे. तोंड पूर्ण उघडलेले हवे.
 •    फक्त स्तनाग्रांवर जेव्हा बाळ पकडते, तेव्हा ती बाळाच्या तोंडातील हिरडय़ांवर घासली जातात.
 •    सतत घासले जाऊन तिथे चीर पडणे, जखमा होणे असे त्रास सुरू होतात.
 •    केवळ स्तनाग्रे चोखल्याने बाळाला दूधही पुरेसे ओढता येत नाही. परिणामी काही बाळं अजून जोरात ओढतात आणि स्तनाग्रांच्या जखमा वाढतात.
 •     काही बाळांना पडजिभेखाली पडदा असतो. त्याचा आईला त्रास होतो.

वेदना कशा कमी कराव्यात?

 •      सर्वप्रथम बाळ दूध ओढताना कशा पद्धतीने स्तनावर पकड घेते हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. जर बाळाची स्तनांवरील पकड अयोग्य असेल तर स्तनाग्रांना सूज येणे. चीर पडणे, जखमा येणे असा त्रास होऊ शकतो.
 • बाळ दूध ओढताना दुखत असेल तर बाळाची पकड हलकेच सोडावी. यासाठी बाळाच्या तोंडाला कोपऱ्यात स्वच्छ करंगळी सरकवून पकड सैल करावी. आणि पुन्हा स्तनपानाची सुरुवात योग्य रितीने करावी.

बाळाची योग्य पकड म्हणजे काय?

 •      बाळाने दूध पिताना तोंड पूर्ण उघडलेले असावे.
 •     ओठ पूर्णपणे बाहेरील बाजूस कललेले असावे.
 •      स्तनाग्रांसोबत बाजूचा काळा भागदेखील तोंडात घेतलेला असावा.
 •      दूध पाजताना आईला वेदना नसाव्यात.
 • बाळ केवळ स्तनाग्रे ओढत असल्यास काय त्रास होऊ शकतो?

१) बाळाच्या दृष्टिकोनातून –  केवळ स्तनाग्रे ओढल्यास त्यातून पुरेसे दूध बाहेर पडत नाही. तर केवळ थेंब थेंब बाहेर येते. त्यामुळे बाळाची भूक भागत नाही. परिणामी स्तनपान घेऊनही बाळ शांत राहात नाही आणि स्तनपाना वेळी बऱ्याचदा बाळ धरसोड करते आणि रडत राहाते. त्याचबरोबर बाळाचे वजन पुरेसे वाढत नाही.

२) आईच्या दृष्टिकोनातून –  आईच्या स्तनाग्रांनी जखमा होतात. स्तनापान देताना भरपूर वेदना होतात. कारण स्तनाग्रे बाळाच्या हिरडय़ांवर आणि जिभेच्या टोकाशी घासली जातात.

 •    स्तनाग्रांना होणाऱ्या जखमांना जंतूसंसर्ग झाल्यास संपूर्ण स्तनांना सूज येणे, पुढे जंतूसंसर्ग वाढून पू होणे, गाठी होणे हा त्रास होतो.
 •      स्तनांमधून पुरेसे दूध बाहेर न पडल्यास दूधनिर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि दूध कमी तयार होऊ लागते.

जखमा झाल्यास..

 •    स्तनपान हे कधीच दुखणारे नसावे. स्तनपान देताना  छातीला दुखत असल्यास त्वरित स्तनपान समुपदेशकांचा सल्ला घेऊन होणाऱ्या त्रासावर उपाय करावेत.
 •    जंतूसंसर्गाची सुरुवात नसेल, तर औषधांनी त्वरित मात करता येते. जंतूसंसर्ग झाल्यास अँटिबायोटिक्सने संसर्ग आटोक्यात आणता येतो. मात्र पू झाल्यास छोटी शस्त्रक्रिया करून तो पू काढून टाकावा लागतो आणि नियमित ड्रेसिंग करून जखम बरी होते.
 •    स्तनाग्रांवर होणाऱ्या जखमा केवळ बाळाची स्तनावरील पकड योग्य करून आटोक्यात आणता येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 3:29 am

Web Title: breast pain women during breastfeeding akp 94
Next Stories
1 प्रोस्टेट ग्रंथीची वाढ
2 अपस्मार
3 फुटाण्याच्या डाळीचे लाडू
Just Now!
X