मागील आठवडय़ात कोसळलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. रस्त्यात पाणी साचल्याची सर्वात जास्त झळ सोसावी लागते ती दुचाकी आणि कारचालकांना. वाहतूक कोंडी, रस्त्यातील खड्डे, कार घसरणे अशा प्रकारच्या अनेक दिव्यांचा सामना पावसाळय़ात करावा लागतो. पावसाआधी गाडीची सव्‍‌र्हिसिंग करणे जेवढे आवश्यक आहे. तेवढेच महत्त्वाचे गाडी चालवताना काळजी घेणे आहे. बरेच लोक पावसाळय़ात वाहनाची काळजी कशी घ्यावी याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना दुरुस्तीच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागतो. साचलेल्या पाण्यात वाहन नेल्याने ते बंद पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाहेर पडण्याआधी आपल्या वाहनाची योग्य तपासणी आवश्यक आहे.

पावसाळय़ात हवेतील गारव्याचा आनंद घेत धुक्यातून वाट काढत दूर फेरफटका मारण्यासाठी जाण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु रस्त्यांची दुर्दशा आणि साचणारे पाणी यामुळे शहरातदेखील वाहन चालवणे जिकिरीचे होऊन जाते. पावसाळय़ाच्या काळातच सर्वाधिक वाहन अपघातांची नोंद होते आणि यामध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त असते. पण अशा वेळी घाबरून न जाता गाडी चालवताना काही गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या गाडीचे आयुष्यदेखील वाढेल आणि तुमचा प्रवासही आनंदी होईल.

पावसाळय़ात घराबाहेर पडताना आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी कुठल्या मार्गावर वाहतूक कोंडी कमी आहे किंवा पाणी कमी साचले आहे. याची माहिती घेतल्यास आपला वेळ वाचतो आणि प्रवास सुसहय़ होतो. पावसाळा सुरू होण्याआधी गाडीला बॉडी कोटिंग करणे, टायर्स तपासणे, इंजिन ऑईल, ब्रेक ऑईल बदलणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या वाहनावर पडणारा ताण कमी होतो.

हेडलाइट

पावसात दृश्यमानता कमी होत असल्याने हेडलाइट आणि इंडिकेटर्स चालू स्थितीत असायला हवेत. गाडी रस्त्याच्या कडेला उभी केल्यास इंडिकेटर लाइट्स सुरू करावेत. लाइट तुटले असतील किंवा त्यांना तडा गेला असल्यास ताबडतोब बदलून टाका. पिवळय़ा लाइटचा वापर करा.

बॉडी कोटिंग

तुमच्या कारवर असलेली कोटिंग ही वेगवेगळय़ा हवामानाला सहन करण्यासाठी सक्षम असते. परंतु सुरक्षेचा उपाय म्हणून बॉडी कोटिंग करणे हे निश्चितच फायद्याचे असते. कोटिंगमुळे तुमच्या गाडीचा मूळ रंग तर सुरक्षित राहतो, तर अंडरबॉडी कोटिंग केल्यामुळे तुमच्या गाडीचा पत्रा गंजत नाही.

टायर्स

पावसाळय़ात रस्त्यावरून गाडी घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात वाहनाला चांगले टायर्स लावणे आवश्यक आहे. टायर झिजले असल्यास वळणावर किंवा चिखलातून जाताना गाडी घसरण्याचा धोका असतो. त्यामुळे टायरचा पृष्ठभाग तपासून त्याचे ट्रेडर्स पुरेसे खोल आहेत का नाही याची खात्री करून घ्या.

वायपर

पावसाळय़ात वायपर योग्य रीतीने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. वायपर्स धुळीमुळे खराब झाले असल्यास त्यांना साबणाने स्वच्छ करा. वायपर्सचे रबर ब्लेड कालांतराने कडक होतात त्यामुळे विंडस्क्रीनवर ओरखडे येऊ  शकतात. प्रवासाला निघण्यापूर्वी वायपर यंत्रणा योग्य प्रकारे काम करतेय का नाही याची खात्री करून घ्या.

छत्री बाळगा

पावसात तुमच्या गाडीत छत्री असणे आवश्यक आहे. गाडीतून बाहेर पडताना छत्रीचा उपयोग तर होतो. कपडे भिजले असताना तुम्ही गाडीत बसल्यावर कारच्या सीट ते पाणी शोषून घेतात. ओलावा धरल्याने गाडीमध्ये दर्प येऊ  शकतो.

विंडस्क्रीन स्वच्छ ठेवा

मुसळधार पावसात गाडी चालवताना दृश्यमानता कमी होऊ  शकते म्हणून प्रवासाला निघण्याआधी विंडस्क्रीन स्वच्छ करा. विंडस्क्रीनवर तेलाचे किंवा ग्रीसचे डाग पडले नाहीत हे तपासून घ्या. काचेवर कचरा किंवा माती साचली असल्यास वायपरने ते साफ करण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे काचेला ओरखडे पडण्याची शक्यता असते. माती किंवा धूळ साफ करण्यासाठी कागद अथवा कपडय़ाचा वापर करा.

पाण्यात इंजिन सुरू करू नका

पाण्यातून गाडी नेताना ती बंद पडल्यास पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे टेलपाइपमधून पाणी इंजिनमध्ये जाण्याचा धोका असतो. अशा वेळी गाडीतून उतरून धक्का मारून गाडी पाण्यातून बाहेर काढणे योग्य आहे. पाणी साचलेल्या भागातून गाडी नेताना वेग कमी करू नका. गाडी सुरू होत नसल्यास गॅरेजमध्ये नेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

खड्डय़ांपासून सावधान सस्पेन्शन तपासा

हवेचा दाब कमी असल्याने टायर खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे कारचे किंवा बाईकचे सस्पेन्शन योग्य स्थितीत आहे का? हे तपासून पाहा.

नजर रस्त्यावर ठेवा

खड्डय़ांना चुकवताना नेहमी रस्त्यावरील इतर वाहनांकडे आणि पादचाऱ्यांकडे लक्ष द्या. खड्डा चुकवताना वेळीच दिशा बदलता न आल्यास वेग कमी करा. आदळण्यापूर्वी ब्रेक दाबू नका.

वेगावर नियंत्रण ठेवा

वेगावर नियंत्रण असल्यास तुम्ही सुरक्षितपणे खड्डा चुकवू शकता. जितक्या वेगात तुमचे वाहन असणार तेवढय़ाच तीव्रतेने खड्डय़ात वाहन धडकणार. खड्डय़ांमुळे गाडीच्या खालच्या भागाला नुकसान होण्याची सवात जास्त शक्यता असते.

सुरक्षा महत्त्वाची

कारचालकांनी नेहमी सीटबेल्ट लावणे गरजेचे आहे. खड्डा चुकवता न आल्यास सीटबेल्टमुळे हादऱ्याची तीव्रता कमी जाणवते. त्याचप्रमाणे बाईकस्वारांनी पावसाळय़ात हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. मजबूत आणि सुरक्षित हेल्मेटची निवड करा. हेल्मेटची काच कापडाने पुसून स्वच्छ ठेवत जा.